जामखेड : आम्हाला आमची चुक दाखवून देणे हा पत्रकारांचा अधिकार, पत्रकारांनी गोरगरिबांसाठी काम करावे – तहसीलदार योगेश चंद्रे, जामखेड तहसिल कार्यालयात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जनता आणि प्रशासनामधला महत्वाचा दुवा म्हणून लोकशाहीचा चौथा अधारस्तंभ असलेले पत्रकार प्रशासनाला नेहमी मदत करत असतात, सामान्यातल्या सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारांची भूमिका निर्णायक ठरत आलेली आहे. प्रिंट मिडियानंतर आता इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल मीडियाचे महत्व वाढले आहे. कुठेही घडलेली घटना एका क्षणात जगभर जात आहे. त्यामुळे पत्रकारांची जबाबदारी आता अधिक वाढली आहे, असे प्रतिपादन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जामखेड तहसिल कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार दिनानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकारांना शिवचरित्र गुलाब पुष्प देऊन तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना जामखेड मीडिया क्लबचे सचिव सत्तार शेख म्हणाले की, ज्याची बातमी दर्जेदार असेल त्याला सांगायची गरज नाही, मी असाय, मी तसाय, मी मोठाय का छोटाय. बातमीवर काम करणारे पत्रकार वाढावेत ही माझी भूमिका आहे. तुमची बातमी दर्जेदार असली पाहिजे, बातमीच्या विषयाला तुम्ही कसा न्याय देता, कुठल्या विषयावर तुम्ही किती संशोधन करता, किती वर्क आऊट करता यावर तुमच्या पत्रकारितेचा दर्जा ठरतो. तसेच शेख पुढे म्हणाले की, प्रशासन म्हणून तुम्हाला जर वाटलं की, हा विषय आम्ही लिहिला पाहिजे आणि तो लोकप्रतिनिधींच्या माध्यमांतून सुटला पाहिजे, असे प्रश्न आम्हा सर्वांना कळवा, आम्ही पत्रकार कुठलीही अपेक्षा न करता तुमच्या पाठीशी शंभर टक्के आहोत, पत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात शासन स्तरावर जी आवश्यक कार्यवाही करता येईल त्यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करत सत्तार शेख यांनी पत्रकारांचा सन्मान केल्याबद्दल महसुल विभागाचे आभार मानले.
यावेळी पुढे बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की, इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून समाजाला सोडवण्यासाठी आणि मुक्त करण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्राच्या माध्यमांतून समाज जागृती निर्माण केली. इंग्रज सत्तेविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी सर्व जनतेला दिली. अतिशय कमी वयात त्यांनी केलेलं कार्य आजच्या पत्रकारितेला प्रेरणादायी आणि ऊर्जादायी आहे. स्वता: आणि कुटुंबांचा विचार न करता समाजाच्या प्रश्नांसाठी पत्रकार नेहमी झटत असतात, पत्रकारांचा यथोचित सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे, असे चंद्रे म्हणाले.
संघटना प्रत्येक क्षेत्रात आहेत, तश्या आमच्याही क्षेत्रात आहेत. एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक विचार मांडता येत नाहीत तेव्हा ते विचार संघटनेच्या माध्यमातून वरच्या पातळीवरती मांडले जातात. यातून सर्वांचा विचार एकत्रित मांडला जातो, त्याचसाठी संघटना स्थापन केली जाते. आचार विचार आणि प्रवृत्ती याच्यावर संघटना स्थापन होत असते,जरी प्रत्येकाचा संघटना स्थापनेचा विचार वेगळा असेल तरी त्यांचा उद्देश एकच असतो, आपल्या संघटनेच्या अंतर्गत जे लोक आहेत, त्यांना आपण कसा कश्याप्रकारे चांगला न्याय देता येईल. असे यावेळी योगेश चंद्रे म्हणाले.
संघटना कितीही असल्या तरी सगळ्या संघटनांनी ज्या ठिकाणी लोकशाहीचे मुद्दे आहेत, ज्या ठिकाणी लोकांचा संदर्भ आहे, ज्या ठिकाणी लोकांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे त्याठिकाणी आपल्यामधले जे काही हेवेदावे असतील ते बाजुला ठेवुन आपण एकत्र आलं पाहिजे आणि गरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, असे अवाहन यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले, एखादी गोष्ट कदाचित आम्हाला लोकांमार्फत कळत नाही, लोकं आमच्यापर्यंत पोहचत नाहीत, किंवा त्यांना आमच्यापर्यंत पोहचू देत नाहीत, परंतू तुम्ही लोकं तळागाळापर्यंत पोहचलेले असतात, गावांमध्ये फिरत असतात, चार लोकांमध्ये तुम्ही वावरत असतात, त्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतात, तुम्ही त्या आम्हाला सांगतात, कधी आमचं चुकतं असेल, तरी तुम्ही आम्हाला सांगतात की, याठिकाणी आपल्याकडून चुक होत आहे, आपण या ठिकाणी सुधारणा करणं गरजेचं आहे, हाही तुमचा अधिकार आहे. आम्हाला आमची चुक दाखवून दिली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमचं सहकार्य तुम्हाला नेहमीच राहणार आहे. आपला प्रश्न असो किंवा समाजातील कुठल्याही गोरगरीब माणसाचा प्रश्न असो तो आमच्यापर्यंत घेऊन या त्याला आम्ही नक्कीच आमच्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न करू, आपल्या माध्यमांतून जर कोणाला न्याय भेटणार असेल तर त्याच्या चेहर्यावरील हास्य बघून आपण घेतलेल्या मेहनतीचे समाधान आणि आनंद आपल्याला मिळतो, असे यावेळी योगेश चंद्रे म्हणाले.
पत्रकार आणि अधिकारी यांच्यात आजवर आपण जसा बाँडिंग टिकवला आहे, तो पुढेही टिकवत रहावू, आपल्या सर्वांच्या माध्यमांतून लोकांचे प्रश्न कसे सुटतील यासाठी प्रयत्न करूयात.श्रीमंत कसाही त्याच्या पध्दतीने न्याय मिळविल पण गरिबाला जो न्याय देतो त्याचं मूल्यमापन सगळ्याच पातळीवर होतं, त्याच्यामुळे जे काही करायचं आहे ते गरिबांसाठी करा. त्याच्या हक्कासाठी करा, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी करा, ते करण्यासाठी तुम्हाला आमच्याकडून जेवढं सहकार्य आवश्यक असेल ते नेहमी देण्यासाठी आमचा विभाग तत्पर असणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही गरिबांचं काम निस्वार्थ भावनेनं आमच्याकडे घेऊन या, आम्ही नक्कीच मदत करू, असा शब्द यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी यावेळी बोलताना दिला.
यावेळी अविनाश बोधले, लियाकत शेख, दत्ता राऊत, डाॅ प्रकाश खंडागळे, मिठूलाल नवलाखा, संजय वारभोग, यासीन शेख, सह आदी पत्रकारांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी जामखेड मीडिया क्लबचे उपाध्यक्ष अशोक वीर, सचिव सत्तार शेख, अविनाश बोधले, किरण रेडे, पप्पुभाई सय्यद, अजय अवसरे, धनराज पवार, रोहित राजगुरू, लियाकत शेख, ओंकार दळवी, समीर शेख, शिवाजी इकडे, मिठूलाल नवलाखा, नासीर पठाण, यासीन शेख, सह आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर कोळेकर यांनी केले तर आभार सर्कल गव्हाणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.