जामखेड : रात्रीस खेळ चाले.. रोहित पवारांचा यु टर्न.. ‘त्या’ शेतकऱ्यांची मध्यरात्री भेट.. ‘जो बुंद से गयी वो हौद से नही आती’ या चर्चेने कर्जत जामखेड मतदारसंघात धरलाय जोर !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । गाडीसमोर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांचे निवेदन न स्विकारता, त्यांच्याशी कोणताही संवाद न करता आमदार रोहित पवार थेट दुसर्या गाडीत बसून निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी खर्डा येथून समोर आला होता.या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड वायरल झाला होता. आमदार रोहित पवारांनी यु टर्न घेत शुक्रवारी मध्यरात्री खर्ड्यातील अंदोलक शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांची भेट घेतली. रस्त्याच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला.एकुणच घडलेल्या या प्रकारानंतर ‘जो बुंद से गयी वो हौद से नही आती’ अशीच चर्चा आता कर्जत-जामखेड मतदारसंघात जोरदारपणे रंगली आहे.
राष्ट्रवादीचे परंपरागत मतदार असलेल्या शेतकऱ्यांनी खर्डा – जुना वाकी रस्ता या रस्त्याचा प्रश्न निकाली काढावा असा आग्रह गेल्या तीन वर्षांपासून आमदार रोहित पवार यांच्याकडे लावून धरला होता.वेळोवेळी निवेदन दिले होते. पण प्रश्न काही निकाली निघत नव्हता. शुक्रवारी आमदार रोहित पवार खर्डा दौर्यावर होते. या दौऱ्यात त्यांना पुन्हा एकदा निवेदन देऊन आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधायचे शेतकऱ्यांनी ठरवले होते. या शिष्टमंडळाने रोहित पवार खर्ड्यात येताच त्यांची गाडी आडवली. सर्व शेतकरी पवार यांच्या गाडीसमोर ठाण मांडून बसले. शेतकऱ्यांना वाटले पवार गाडीतून उतरून आपल्याजवळ येतील, आपली कैफियत ऐकतील, आपला प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द देतील, पण घडलं उलटचं, पवार गाडीतून उतरले, रागाच्या भरात शेतकऱ्यांना बसा तिथेच म्हणत दुसर्या गाडीत निघून गेले.
आमदार रोहित पवार हे दुसर्या गाडीत जाऊन बसत असताना राष्ट्रवादीचे स्थानिक नेते व कार्यकर्ते ओ दादा ओ दादा अशी हाक मारत होते परंतू रोहित पवारांनी कोणाचेच काहीऐक न ऐकता तेथून पळ काढला. झाल्या प्रकाराचा व्हिडीओ अवघ्या काही मिनिटांत सोशल मिडीयावर वायरल झाला.रोहित पवारांनी शेतकऱ्यांप्रति दाखवलेली असंवेदनशीलतेवर सोशल मिडीयावर संतप्त प्रतिक्रियांचा उमटू लागल्या. अनेकांनी पवारांच्या त्या कृतीचे वाभाडे काढले. भाजपकडूनही जोरदार टीका करण्यात आली.
दरम्यान, खर्डा – जुना वाकी रस्त्याच्या प्रश्नांवरून खर्ड्यातील शेतकऱ्यांबाबत घडलेल्या प्रकाराबाबत जामखेड टाइम्ससने सचित्र वृत्त प्रसिध्द करत आवाज उठवला होता. खर्ड्यात घडलेल्या घटनेबाबत सोशल मिडीयावर जोरदार टीका होण्याबरोबरच राष्ट्रवादीच्या पारंपारिक मतदारांमध्ये नाराजीची लाट उसळल्याचे लक्षात येताच आमदार रोहित पवारांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास खर्डा गाठले.
राष्ट्रवादीच्या नेत्याच्या घरी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची आमदार पवार यांनी भेट घेतली. तासभर चर्चा केली. खर्डा ते जुना वाकी रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचा शब्द दिला. 25 लाखाची तरतुद करतो असे सांगितले. या बैठकीत कार्यकर्त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शनिवारी शेतकऱ्यांच्या भेटीचे फोटोसोशल मिडीयावर टाकत काही घडलचं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न केला खरा, परंतू शुक्रवारी सोशल मिडीयावर वायरल झालेला व्हिडीओ खूप बोलका ठरला आहे. यामुळे ‘जो बुंद से गयी वो हौद से नही आती’ अशी जोरदार चर्चा कर्जत-जामखेड मतदारसंघात चर्चिली जात आहे.