जामखेड : आमदार प्रा.राम शिंदे यांनी जामखेड बाजार समितीच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री व पणनमंत्र्यांची भेट घेत केली मोठी मागणी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कांदा अनुदानापासून वंचित राहिलेल्या जामखेड तालुक्यातील 4613 कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. कांदा अनुदानाच्या प्रश्नांवरून आमदार प्रा.राम शिंदे यांनी जामखेड बाजार समितीच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पणनमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. कांदा अनुदानापासून वंचित असलेल्या जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने अनुदान द्यावे, अशी मोठी मागणी त्यांनी यावेळी निवेदनाद्वारे केली.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रति क्विंटल 350 रूपये कांदा अनुदान जाहीर केले होते. या अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत कांदा विक्री केलेले शेतकरी पात्र ठरणार होते. त्यानुसार कांदा अनुदान मिळवण्यासाठी पणन विभागाने बाजार समित्यांच्या माध्यमांतून शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले होते. जामखेड तालुक्यातील 2682 शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केले होते. त्यापैकी 1113 शेतकऱ्यांचे अर्ज छानणीत अपात्र करण्यात आले होते. तसेच बाजार समितीच्या इतर चार खरेदीदार व्यापाऱ्यांच्या आडतीवर 3500 शेतकऱ्यांनी कांदा विक्री केलेला आहे. ते सर्व शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित आहेत. त्यानुसार जामखेड तालुक्यातील एकुण 4613 शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित आहेत.
जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नयेत यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी जामखेड बाजार समिती पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह आज 21 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पणनमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील 4613 शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित आहेत. त्यांना सरकारने न्याय द्यावा, अशी मागणी केली.
यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांनी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील 2682 शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी अर्ज केले होते. त्यापैकी 1113 शेतकऱ्यांचे अर्ज हस्तलिखित नोंद व इतर कारणाने छानणीत अपात्र करण्यात आले होते. कांदा अनुदान योजनेमध्ये एकुण प्राप्त संख्येनुसार अपात्र होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित राहीले आहेत.
अर्ज बाद झालेल्या शेतकऱ्यांनी आपला कांदा जामखेड बाजार समितीच्या आवारातील व्यापाऱ्यांकडे घातलेला आहे. 1113 शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी आपल्या अनुदान अर्जामध्ये जी अपुर्तता आहे. उदाहरणार्थ 7/12 उताऱ्यावर नोंद नसणे, उताऱ्यावर हस्तलिखित नोंद असणे परंतू 7/12 उताऱ्यावर इतर नोंदी व ताळमेळ नसणे इत्यादी बाबी लेखापरीक्षकांच्या तपासणी कामी अपुर्तता दर्शवली असून ती शेतकऱ्यांनी पुर्ण करुन दिलेली आहे. त्यामुळे 1113 शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार त्यांना तातडीने कांदा अनुदान मंजुर करावे, अशी मागणी आमदार प्रा.राम शिंदे यांनी केली आहे.
त्याबरोबर पुढे निवेदनात म्हटले आहे की, जामखेड बाजार समितीच्या इतर चार खरेदीदार व्यापाऱ्यांच्या आडतीवर 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या काळात 3500 शेतकऱ्यांनी कांदा विक्री केलेला आहे. ते सर्व शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना शासनाच्या कांदा अनुदान योजनेत पात्र करावे, अशी मागणी आमदार प्रा राम शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या मागणीची पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीने दखल घेतली. यावेळी त्यांनी पणन उपसंचालक व अहमदनगर जिल्हाधिकारी यांना जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन कांदा अनुदानात अपात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या आर्जाची फेर तपासणी करावी असे आदेश दिले. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या मागणीमुळे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या आदेशामुळे जामखेड तालुक्यातील 4613 शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पणनमंत्री अब्दुल सत्तार यांना भेटलेल्या शिष्टमंडळात जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद (दादा) कार्ले, संचालक सचिन घुमरे, अंकुश ढवळे, राहुल बेदमुथ्था, नंदू गोरे, डाॅ गणेश जगताप, सुरेश पवार बबन हुलगुंडे व कांदा कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित सह आदींचा समावेश होता.
कर्जत – जामखेडमधील दुष्काळसदृश परिस्थितीकडे आमदार प्रा.राम शिंदे यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष
कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदा पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे मतदारसंघात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, याची माहिती आमदार प्रा.राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. कर्जत जामखेड मतदारसंघात दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे त्यावर उपाययोजना राबविण्यासाठी मतदारसंघात चारा, छावण्या, पाण्याचे टँकर करावेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक विमा मिळवा याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कर्जत जामखेडमधील जनतेच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. दुष्काळसदृश परिस्थितीत सरकार शेतकरी आणि जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल असे त्यांनी यावेळी अश्वासन दिले.