जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । महाराष्ट्रात प्रसिध्द असलेली जामखेडची नागपंचमी यात्रा निर्भय वातावरणात पार पडावी, यात्राकाळात कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये, यात्रेला येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये तसेच यात्रा उत्साहवर्धक वातावरणात पार पडावी यासाठी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जामखेड पोलिस दलाने तगडे नियोजन केले आहे.
जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वराची यात्रा श्रावण शुद्ध पंचमीला आहे. ही यात्रा महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने दरवर्षी हजेरी लावत असतात परंतू कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षे यात्रा होऊ शकली नव्हती. त्यामुळे यंदा होत असलेल्या यात्रेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
यंदा यात्रेत गर्दीचा उच्चांक होऊ शकतो. त्यादृष्टीने तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत.जामखेड नगरपरिषदेच्या सहकार्यातूून जामखेेड पोलिस दलाने जामखेड शहरात सुरक्षिततेच्या तगड्या उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे.
नागपंचमी यात्राकाळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, गुंड प्रवृत्तीच्या तत्वांकडून यात्रेला गालबोट लावले जाऊ नये, नागरिकांना निर्भयपणे यात्रेचा आनंद लुटता यावा यासाठी यात्रेतल्या प्रत्येक गोष्टींवर जामखेड पोलिसांची विशेष नजर असणार आहे. यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
25 CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमांतून जामखेड पोलिसांची यात्रेवर बारकाईने नजर असणार आहे. याशिवाय वेशांतर केलेले पोलिस, पोलिस मित्र गर्दीच्या ठिकाणी गस्त घालताना दिसणार आहेत. ज्या भागात नर्तिकांचे डाव असणार आहेत त्या ठिकाणी व्हिडीओ कॅमेरे वाॅच ठेवणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी आनंद मेळावा भरणार आहे तो संपूर्ण परिसर CCTV च्या निगराणी खाली असणार आहे.
यात्राकाळात नागरिकांना कुठलीही मदत तात्काळ मिळावी याकरिता शहरात सात ठिकाणी पोलीस चौक्या कार्यान्वित होणार आहेत. सात पोलिस अधिकारी, 100 पोलिस कर्मचारी, होमगार्ड जवान, पोलिस मित्र तसेच विशेष पोलिस पथक तैनात असणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी दिली.
जामखेड नगरपरिषदेच्या माध्यमांतून यात्रेसाठी नियोजन केले जात आहे. यात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच अग्निशमन गाडी आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे. पालखी मार्गातील अडथळे दुर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेगाने राबवल्या जात असल्याची माहिती जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली.