जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड पंचायत समितीच्या प्रवेशद्वारासमोर गटाराचे पाणी साचल्याने सदरचे प्रवेशद्वार गटारगंगा बनले आहे. पंचायत समितीत कामानिमित्त येणारे नागरिक आणि सर्वपक्षीय पुढारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना दररोज दुर्गंधीयुक्त चिखल तुडवत पंचायत समितीत प्रवेश करावा लागत आहेत.
जामखेड पंचायतीच्या प्रवेशद्वाराशेजारी गटारीच्या पाण्याचे तळे साचायचे, यामुळे सदरचे पाणी डांबरी रस्त्यावर यायचे. यामुळे वाहन धारकांचे या भागात सतत अपघात व्हायचे, या संदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर नगरपरिषदेने गटारीच्या पाण्याला वाट मोकळी होण्यासाठी छोटीसी चारी खांदली, त्याद्वारे पाण्याचा निचरा होऊ लागला परंतू सदरचे दुर्गंधीयुक्त पाणी पंचायत समितीच्या गेटवर साचून सदरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे.
चिखल तुडवत दररोज नागरिकांना, पुढाऱ्यांना तसेच शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना पंचायत समितीत लागत आहे. या गंभीर प्रश्नावर नगरपरिषदेने कार्यवाही करण्याची वाट न पाहता पंचायत समितीने स्वता: पुढाकार घेऊन प्रवेशद्वारासमोर एक दोन मोठ्या नळ्या टाकून हा प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली असती तर सर्वसामान्यांची त्रासातून सुटका झाली असती. परंतू दुर्दैवाने दुर्गंधीयुक्त चिखलातून वाट काढण्याची नामुष्की सर्वांवरच दररोज ओढवत आहे.
संपुर्ण तालुक्यातील गावपुढारी, विविध पक्षांचे राजकीय नेते दुर्गंधीयुक्त चिखल तुडवत दररोज पंचायत समितीत येजा करत आहेत, त्या सर्वांनी या प्रश्नांवर पंचायत समितीला धारेवर न धरता रोज चिखलातून वाट काढत येरझऱ्या मारण्याची धन्यता मानली आहे, यावरही जनतेतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
जे पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी मागील काळात अनेक गावांमध्ये जाऊन स्वच्छता मोहिम राबवत होते, तेच अधिकारी कर्मचारी पंचायत समितीसमोरील दुर्गंधीयुक्त गटारगंगा हटविण्यासाठी मागे कसे राहिले असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.