जामखेड टाइम्स वृत्तसेवा । १३ जानेवारी २०२४ : जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाच्या (म.फु.कृ.वि.,राहुरी) कृषिदूतांनी मोहा येथे ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषि विस्तार शिक्षणाचा सहभागी ग्रामीण मूल्यांकन उपक्रम सादर केला.
यावेळी कृषिदूत अशरफअली शेख, चंद्रशेखर वाले, किरण दाताळ, सौरभ बोरकर, ओंकार दौंड, विकास जाधव, संविधान वानखेडे यांनी गावकऱ्यांसोबत गावात फेरी मारून गावातील नैसर्गिक संसाधने, सामाजिक- आर्थिक संस्था, शेतजमीन इत्यादी बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली व विविध माहिती गोळा केली. सहभागी ग्रामीण मूल्यांकन ( 𝙿𝚁𝙰 ) उपक्रमांतर्गत रांगोळीच्या सहाय्याने गावाचा नकाशा, लोकसंख्या वर्गीकरण, साक्षरता प्रमाण, पशुधन, पिक वर्गीकरण, लिंग गुणोत्तर यांचा वृत्तालेख काढून दाखवला यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, रस्ते, शेतीचे क्षेत्र, मंदिरे, बालगृह, तलाव इत्यादींचा उल्लेख होता.
गावातील वरिष्ठ नागरिकांच्या मदतीने गाव विकासाचा आढावा घेतला व गावातील समस्या जाणून घेतल्या. ग्रामीण लोकांना त्यांच्या स्वतःच्या समस्या तपासण्यात, त्यांची स्वतःची उद्दिष्टे निश्चित करण्यात आणि त्यांच्या स्वत:च्या उपलब्धींचे निरीक्षण करण्यात यावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, पदाधिकारी तसेच महिला, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल कृषिदूतांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मा. डॉ. गोरक्ष ससाणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. सखेचंद अनारसे, केंद्र प्रमुख डॉ. दत्तात्रय सोनवणे, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. नजीर तांबोळी, कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश लांडे व विषय विशेषतज्ञ कृषि विस्तार डॉ. प्रणाली ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.