जामखेड : संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटलांच्या महासभेस तुफान प्रतिसाद, मराठा क्रांती मोर्चाचे आरक्षणाबाबतचे निवेदन सरकारच्या वतीने आमदार प्रा.राम शिंदे यांनी स्विकारले !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : 17 दिवसांच्या आमरण उपोषणाच्या माध्यमांतून मराठा आरक्षणाच्या लढाईला नवा आयाम देणारे संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार सायंकाळी जामखेड शहरात विराट महासभा पार पडली. मनोज जरांगे पाटलांच्या महासभेस तुफान प्रतिसाद मिळाला, या सभेत मराठा आरक्षण प्रश्नी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांना निवेदन देण्यात आले. सभा सुरू असताना आमदार प्रा.राम शिंदे यांनी सरकारच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन स्विकारले.आपल्या भावना व मागणी सरकारपर्यंत पोहचवू, असे आमदार प्रा.राम शिंदे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 17 दिवसांचे प्राणांतिक उपोषणाचे अंदोलन केल्यानंतर संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांच्या दौर्यावर आहेत. 6 ऑक्टोबर 2023 रोजी ते जामखेड तालुका दौर्यावर आले होते. या दौर्यात सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त असे जंगी स्वागत करण्यात आले.
“संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जामखेड येथील जुन्या तहसील कार्यालयासमोरील मैदानात महासभेचे आयोजन करण्यात आले. हजारो सकल मराठा बांधवांची या सभेला उपस्थिती होती. जरांगे पाटील सभास्थानी दाखल होण्यापूर्वी जामखेड शहरात ठिकठिकाणी त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर बीड काॅर्नर परिसरात क्रेनच्या सहाय्याने हार घालून त्यांचे जामखेड शहरात जंगी स्वागत करण्यात आले. या सभेला तुफान प्रतिसाद मिळाला, मुस्लिम समाजानेही मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला.”
दरम्यान, संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांचे जामखेड शहरात आगमन होण्यापूर्वी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र चोंडी येथे भेट दिली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे वंशज आमदार प्रा.राम शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले.
दरम्यान, रात्री साडे आठच्या सुमारास संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांचे सभास्थानी आगमन झाले. मनोज जरांगे पाटील हे सभास्थानी दाखल होण्याआधी आमदार प्रा.राम शिंदे हे सभास्थानी दाखल झाले होते. आमदार प्रा.राम शिंदे सर्वसामान्य श्रोत्याप्रमाणे जनतेत जाऊन बसले होते. संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांचे सभास्थानी आगमन झाल्यानंतर त्यांचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्वागत करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांचे भाषण सुरू होण्याआधी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षण प्रश्नी आमदार प्रा.राम शिंदे यांना निवेदन दिले.
आमदार प्रा.राम शिंदे हे जनसमुदायात जाऊन बसले होते, त्या ठिकाणी जाऊन मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांना मराठा आरक्षण प्रश्नी निवेदन सुपूर्द केले. तसेच सभेस आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आमदार प्रा.राम शिंदे यांचे यावेळी आभार मानण्यात आले. सकल मराठा समाजाच्या भावना सरकार दरबारी कळवाव्यात असे साकडे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांना घातले. आपल्या भावना व मागण्या सरकारपर्यंत पोहचवू असे आमदार शिंदे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
आमदार प्रा.राम शिंदे यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात आण्णासाहेब सावंत, सभापती पै शरद (दादा) कार्ले, रविंद्र सुरवसे, पवन राळेभात, राहूल उगले, विजयसिंह गोलेकर, दिगांबर चव्हाण, यांचा समावेश होता. यावेळी प्रा सचिन सर गायवळ, डाॅ भगवान मुरुमकर, सोमनाथ राळेभात, बिभिषन धनवडे, पांडुरंग उबाळे, ॲड निकम, प्रविण बोलभट, राम पवार सह आदी उपस्थित होते.
आमदार प्रा राम शिंदे यांच्या साधेपणाने वेधले सर्वांचेच लक्ष !
“मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांची जामखेड शहरात शुक्रवारी सायंकाळी विराट महासभा पार पडली.या सभेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आमदार.राम शिंदे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित सभेला आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सरकारच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन स्विकारले. कुठलाही बडेजाव न करता आमदार प्रा.राम शिंदे हे सभास्थानी थेट जनतेत जाऊन बसले होते.आमदार शिंदे यांनी जनसमुदायात बसून संपुर्ण सभा ऐकली. आमदार शिंदे यांच्या साधेपणाने सर्वांचेच लक्ष वेधले. आमदार शिंदे यांच्या याच साधेपणाची चर्चा आता जामखेड तालुक्यात रंगु लागली आहे.”