जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड नागपंचमीची राज्यात नवी ओळख निर्माण करण्यामध्ये उपमहाराष्ट्र केसरी बबनकाका काशिद, युवराज भाऊ वस्ताद, अजय दादा काशिद आणि कै विष्णू वस्ताद प्रतिष्ठानचे सर्व सहकारी दरवर्षी मोठी मेहनत घेत आहेत. जामखेडच्या कुस्ती मैदानाच्या माध्यमांतून देशातील नामवंत मल्लांसाठी मोठी संधी उपलब्ध करुन देण्याचे काम होत आहे, म्हणूनच जामखेडच्या नागपंचमी यात्रेला राज्यात प्रतिष्ठा मिळाली आहे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांनी केले.
जामखेड नागपंचमी यात्रेनिमित्त नागेश्वराच्या पावन भूमीत कै.विष्णू उस्ताद काशीद ऊर्फ बाबा यांच्या स्मरणार्थ भव्य निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या मानाच्या कुस्तीवेळी हजारो कुस्तीप्रेमींना संबोधित करताना आमदार शिंदे बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की, इंदौरचे हिंद केसरी रोहित पटेल हे सुध्दा आपल्यामध्ये आजच्या कुस्ती मैदानात उपस्थित आहेत. युवराज भाऊंनी कुस्ती पुकारली खरख,पण माझी कुस्ती त्यांच्याबरोबर होणार नाही, असे म्हणताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला होता. शिंदे पुढे म्हणाले की, रोहित पटेल यांच्याबरोबर पुढच्या वर्षी जामखेडच्या मैदानात कुठलाही मल्ल कुस्ती खेळेल ती कुस्ती मी स्पॉन्सर करेल असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
युवराज भाऊ वस्ताद यांच्या माध्यमांतून जामखेड नगरीला आणि पंचक्रोशीतल्या जनतेसाठी गेल्या 20 वर्षांपासून एका चांगल्या कुस्ती मैदानाचे आयोजन पहायला मिळत आहे. मी सर्व हगाम्यासाठी उपस्थित आहे, कधी आमदार, कधी सभापती, कधी राज्यमंत्री, कधी कॅबिनेट मंत्री, कधी पालकमंत्री, आता विधानपरिषद आमदार आणि अजून पुढचं काही सांगत नाही त्यामुळं जाता जाता हा हगामा यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करतो असे यावेळी राम शिंदे म्हणाले.
खालील मान्यवरांची कुस्ती मैदानासाठी उपस्थिती
या भव्य जंगी निकाली कुस्त्यांच्या मैदानासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष मा.मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार बाळासाहेब (काका) आजबे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण (भाऊ) मुंडे, डॉ.भगवान मुरूमकर, पै प्रवीण (दादा) घुले, जयदत्त (भैय्या) धस,रवी सुरवसे, सोमनाथ पाचरणे, सतीश (आबा) शिंदे, मधुकर (आबा) राळेभात, सूर्यकांत मोरे, दत्ता वारे, हिंद केसरी रोहित पटेल,इंदोर येथील नगरसेवक सुधीर कोल्हे, गजानन गावडे, मनिषकाका तसेच जामखेड येथील नगरसेवक सोमनाथ राळेभात, विकास राळेभात,अमित चिंतामणी, पवन राळेभात, पांडुरंग उबाळे तसेच नगर व बीड जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंतिम लढत बरोबरीत
यावर्षीच्या कुस्ती मैदानाची अंतिम कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. बाला रफिक शेख व उपमहाराष्ट्र केसरी पै.अक्षय शिंदे यांच्यात अंतिम झाली. सदर कुस्ती 37 मिनिटे ही कुस्ती चालली. त्यानंतर कुस्ती बरोबरीत सुटली.सदर कुस्तीचे 2 लाखांंचे बक्षीस आमदाा राम शिंदे यांच्या वतीने दोन्ही पैलवानांना विभागुन देण्यात आले.सदर कुस्ती भर पावसात झाली, भरपावसात उभे राहून हजारो कुस्तीप्रेमींनी ही कुस्ती पाहिली.
या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै.मुन्ना झुंजुर्के व पै.भारत मदने यांच्यात झाली,सदर कुस्ती सुद्धा चुरशीची होवून,बरोबरीत सुटली.सदर कुस्तीसाठी आमदार रोहित (दादा) पवार यांच्या वतीने 1लाख रु.चे बक्षीस दोन्ही पैलवानांना विभागून देण्यात आले.कुस्ती मैदानासाठी पंच म्हणून पै.किरण मुळे, पै. पप्पु काशिद, पै.उल्हास वस्ताद माने , पै.संतोष खवळे पै.राजू भैय्या सय्यद, जाकीर सर यांनी काम पाहिले.
या कुस्ती मैदानाचे यंदा 20 वे वर्ष होते. यंदाच्या कुस्ती मैदानात अजय (दादा )काशीद मित्र मंडळाच्या वतीने जामखेड तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान तसेच तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट टी शर्ट देवून सन्मानित करण्यात आले.
उपमहाराष्ट्र केसरी मा.बबन (काका)काशीद, मराठा भाषिय महासंघाचे अध्यक्ष मराठा गौरव युवराज (भाऊ) काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशिद यांच्या नेतृत्वाखाली सदर कुस्ती मैदानाचे आयोजन
करण्यात आले होते. संयोजन टीमने मैदान यशस्वी करण्यासाठी मोठी मेहनत घेतली.
कुस्ती मैदानातील कुस्त्यांचे धावते समालोचन पुजारी अण्णा यांनी दिमाखदार शैलीत केले.तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नारायण राऊत सर व ज्ञानेश्र्वर कोळेकर सर यांनी केले.