जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड शहर आणि तालुक्याच्या राजकीय घडामोडींचे महत्वाचे केंद्र असलेला बहुचर्चित पुढारी वड लवकरच अखेरचा श्वास घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात पुढारी वडावर हातोडा पडणार आहे. यामुळे जामखेड शहराची पुढारी वडामुळे असणारी महत्वाची ओळख लुप्त होणार आहे. जामखेडच्या राजकीय पटाचे महत्वाचे पान यानिमित्ताने इतिहासजमा होणार आहे.
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. शहरातील कामाला आता सुरुवात होणार आहे. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे आणि अतिक्रमणे हटवली जाणार आहेत. त्यामध्ये रस्त्याच्या कडेला असलेली झाडे हटविण्यास प्रारंभ झाला आहे.यामध्ये सर्वाधिक चर्चा ‘पुढारी वडाची’ होत आहे.कारण, जामखेडच्या राजकीय घडामोडींचे महत्वाचे केंद्र म्हणून याची ओळख आहे. या ठिकाणी दररोज सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांची रेलचेल असते.
चहाच्या हाॅटेलमुळे हा वड जामखेडमध्ये प्रसिद्ध आहे. या हाॅटेलमध्ये चहा पिण्यासाठी नेहमी राजकीय नेत्यांची तसेच सर्वसामान्यांची गर्दी असते. याच पुढारी वडाखालून जामखेडच्या राजकारणाची सूत्रे हलतात. राजकीय कुरघोडीच्या राजकारणाचीही खलबते येथेच होतात, तसेच कोण कोणासोबत बसला, यावरही बरीच राजकीय काथ्याकूट होते, त्याचबरोबर या वडाखाली बसून होणाऱ्या राजकीय चर्चेतून कोणाला बळ द्यायचे ? कोणाचा कार्यक्रम करायचा ? याचेही खलबते होतात, अशी नेहमी चर्चा असते. राजकीय नेते कार्यकर्ते यांच्या वर्दळीमुळे प्रसिद्ध असलेला हा वड अनेकांची राजकीय कारकीर्द नव्या उंचीवर घेऊन जाणारा ठरलेला आहे, तर काहींचा गेम करणाराही ठरला आहे.
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे पुढारी वड कापला जाणार आहे, यामुळे येथील हाॅटेलही स्थलांतरीत होणार आहे. आजवर या पुढारी वडाखाली अनेक रंजक किस्से घडले आहेत, या किस्स्यांची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नेहमीच चर्चा रंगलेली असते. पुढारी वडाला भेट दिल्याशिवाय तुमची चर्चा होणार नाही, अशी बतावणी करून अनेक मोठ्या नेत्यांना वडाखाली आणले जाते, गरमागरम चहावर ताव मारत राजकीय गप्पांचा फड रंगवला जातो, हे गेल्या अनेक वर्षांपासून घडत आलेलं आहे, मात्र आता पुढारी वड जमीनदोस्त होणार असल्याने पुढारी वडाखाली घडलेले राजकीय किस्से एक इतिहास म्हणून जामखेडच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहतील हे मात्र निश्चित!