जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कीर्तनाच्या मानधनातून शाळा समृद्ध करणाऱ्या जामखेडच्या शिक्षकाचा कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात पार पडलेल्या सहाव्या राष्ट्रीय शिक्षण संमेलनात (National Education Conference Sanjay Ghodawat University Kolhapur) गौरव करण्यात आला. दत्तवाडी शाळेचे शिक्षक मनोहर इनामदार (Manohar Inamdar) यांचा झालेला हा गौरव जामखेड (Jamkhed) तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरला आहे.
ॲक्टिव्ह टिचर्स सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र (ए.टी.एम.) (Active Teachers Social Foundation Maharashtra) च्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात 6 वे राष्ट्रीय शिक्षण संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 20 व 21 मे रोजी हे संमेलन पार पडले. या संमेलनात उच्चपदस्थ अधिकारी तसेच महाराष्ट्रासह गुजरात, उत्तरप्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश सह विविध राज्यातील कृतिशील शिक्षक व शिक्षण अभ्यासक सहभागी झाले होते. दत्तवाडी शाळेचे शिक्षक मनोहर इनामदार यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत त्यांचा या संमेलनात गौरव करण्यात आला.
‘माझी समृद्ध शाळा’ या सत्रामध्ये शिक्षक मनोहर इनामदार यांना दत्तवाडी शाळेची यशोगाथा सादर केली. शिक्षक इनामदार यांनी जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी येथे सर्व पालक व ग्रामस्थांच्या सहकार्याने मागील 15 वर्षांपासून राबविलेल्या एक दिवस वंचितांसाठी, पालकांसह शैक्षणिक सहल,तालुकास्तरीय मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे,कलाकौशल्य विकासासाठी विविध कार्यशाळा,लेक शिकवा अभियानांतर्गत आदर्श माता पुरस्कार,विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी केलेली शालेय रंगरंगोटी, शिष्यवृत्ती परिक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सायकल बक्षीस, प्रेरणादायी व्यक्तींच्या मुलाखती, मातृसन्मान सोहळा व आजी-आजोबा मेळावा, शाळा स्थापनेचा रौप्य महोत्सव, विद्यार्थ्यांचे काव्यसंमेलन, शैक्षणिक पुस्तकांची निर्मिती व प्रकाशन इ. नाविन्यपूर्ण व प्रेरणादायी उपक्रमांची लोकसहभागातून सातत्याने प्रभावी अंमलबजावणी करून त्यातून शाळेचा झालेला कायापालट याबद्दल सविस्तर माहिती सादर केली.
कृतिशील शिक्षक मनोहर इनामदार हे कवी, लेखक संपादक, गीतकार तसेच संत साहित्याचे अभ्यासक म्हणून राज्यात ओळखले जातात. इनामदार हे 15 वर्षांपासून धोंडपारगाव येथील दत्तवाडी शाळेत कार्यरत होते. शाळेच्या भौतिक विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ते नेहमी विधायक उपक्रम राबवत आले आहेत. या काळात त्यांनी सुट्टीच्या कालावधीत विविध ठिकाणी किर्तन-प्रवचनांची सेवा दिली. या सेवेच्या माध्यमांतून त्यांना मिळालेले 7 लाख रूपयांचे मानधन दत्तवाडी शाळेसाठी समर्पित करून शाळेचा राज्यस्तरावर नावलौकीक वाढविला. याचीच दखल नुकत्याच पार पडलेल्या 6 व्या राष्ट्रीय शिक्षण संमेलनात घेण्यात आली. या संमेलनात शिक्षक मनोहर इनामदार यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
दोन दिवस चाललेल्या या संमेलनात राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे ,पूर्व शिक्षण संचालक डाॅ.गोविंद नांदेडे व दिनकर टेमकर,कोल्हापूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, हिमाचल प्रदेश केंद्रीय विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू डाॅ.कुलदीपचंद अग्निहोत्री इ. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन होते.
या संमेलनाच्या यशस्वितेसाठी कृतिशील शिक्षक महाराष्ट्रचे राज्यसंयोजक तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विक्रम अडसूळ,नारायण मंगलारम,ज्योती बेलवले, ज्ञानदेव नवसरे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कृतिशील शिक्षक बांधवांनी विशेष प्रयत्न केले.
राष्ट्रीय शिक्षण संमेलनात शाळेची यशोगाथा सादर करून जामखेड तालुक्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, माजी गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, नान्नज बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश कुंभार, नान्नजचे केंद्रप्रमुख कुमटकर, उद्योगपती संतोष पवार यांच्यासह दत्तवाडी शाळेतील सर्व पालक व धोंडपारगावचे ग्रामस्थ यांनी इनामदार यांचे अभिनंदन केले आहे.
मनोहर इनामदार यांची बदली…
धोंडपारगावच्या दत्तवाडी शाळेत गेल्या 15 वर्षांपासून नाविण्यपूर्ण सेवा देऊन शाळेसह जामखेड तालुक्याचा राज्यात नावलौकीक मिळवून देणारे शिक्षक मनोहर इनामदार यांची ऑनलाईन बदली प्रक्रियेत बांधखडक येथे बदली झाली आहे. इनामदार यांनी धोंडपारगाव येथे दिलेली सेवा राज्यात दखलपात्र ठरली आहे. इनामदार यांची बदली होताच आजी-माजी विद्यार्थी व धोंडपारगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांना नुकताच निरोप देण्यात आला. निरोप समारंभाच्या वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कृतज्ञता जपणारा शिक्षक आपल्याला सोडून जात आहे भावना उपस्थितांच्या आश्रूंचा बांध फोडणारी ठरली. जड अंतःकरणाने गावकऱ्यांनी नुकताच शिक्षक मनोहर इनामदार यांना निरोप दिला.