Karjat Letest News । प्रांताधिकारी शिवीगाळ व धक्काबुक्की प्रकरणात समोर आली मोठी घडामोड : मुजोर व्हरकटेच्या अडचणी वाढल्या
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । डाॅ अफरोजखान पठाण । Karjat Letest News | प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना झालेल्या शिवीगाळ व धक्काबुक्की प्रकरणात मंगळवारी एक मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी असलेला वाळू तस्कर पोलिस कर्मचारी केशव व्हरकटे याच्या अडचणी आता वाढल्या आहेत.
गेल्या दोन तीन दिवसांपासून कर्जत तालुका एका गंभीर घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात चर्चेत आलेला आहे. कर्जतमधील वाळूतस्कर पोलिस कर्मचाऱ्याने थेट प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना शिवीगाळ धक्काबुक्की करण्याचा मुजोरपणा केला होता. या घटनेमुळे कर्जतमधील वातावरण चांगलेच तापलेले आहे या प्रकरणातील आरोपीविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात कलम 353 चा समावेश व्हावा व व्हरकटेला बडतर्फ करण्यात यावे याकरिता महसुल संघटना आक्रमक झाल्या होत्या.
महसुल कर्मचारी संघटनांनी सोमवारपासून काम बंद अंदोलनाचे हत्यार उपसले होते. या प्रकरणात मंगळवारी एक नवी घडामोड समोर आली आहे. आरोपी पोलिस कर्मचारी केशव व्हरकटे याच्याविरोधात दाखल गुन्ह्यात कलम 353 चा समावेश करण्यात आला असल्याची माहिती कर्जत पोलिस प्रशासनाने कर्जत तालुका तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष धुळाजी केसकर यांना दिलेल्या पत्राद्वारे दिली आहे.
वाळूतस्कर पोलिस कर्मचारी केशव व्हरकटे याच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी दिलेल्या जबाबात जबाबानुसार व्हरकेटविरोधात कलम 353, कलम 332 ही नवीन वाढीव कलमे दि 22 रोजी लावण्यात आली आहे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक यादव म्हणतात…
कर्जतचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील वाळूतस्कर पोलीस कर्मचारी याच्याकडून झालेली मारहाण, शिवीगाळ निंदनीय असून कर्जत पोलीस प्रशासन त्याचा निषेध करते. झालेल्या घटनेचा तपास योग्य दिशेने आणि पारदर्शक होत आहे यात कोणीही काडीमात्र शंका घेऊ नये. व्हरकटे यास त्याच दिवशी पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी निलंबीत केले असून दि २२ रोजी थोरबोले यांच्या जबाबानुसार सदरच्या घटनेत वाढीव ३५३ आणि ३३२ कलम लावण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. पो नि यादव यांनी कर्जत तलाठी संघटनेच्या आंदोलनास भेट देत त्यांच्याशी चर्चा केली.
शुक्रवार, दि १९ रोजी कर्जतचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करताना पोलीस उपअधीक्षक कार्यलयातील वाळूतस्कर पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याने शिवीगाळ करीत मारहाण केली होती. तसेच तो टीपर पळवून नेला होता. याबाबत कर्जत पोलिसांनी व्हरकटे याच्यावर भादवी कलम ३७९, १८६, ५०४,३४ यासह पर्यावरण संरक्षण अधिनियम ३/१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यावर कर्जत महसुल प्रशासनाचे समाधान न झाल्याने तसेच गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंब, पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याच्यावर बडतर्फ कारवाई करावी यासह सदर गुन्ह्यात ३५३ कलम न लावण्यात आल्याने काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महसुल प्रशासनाची पोलिस निरीक्षक यादव यांनी घेतली भेट
मंगळवार, दि २३ रोजी दुपारी १२ वाजता पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत महसुल प्रशासनाशी आंदोलनस्थळी भेट घेत त्यांना तपासाबाबत माहिती दिली. यासह सोमवार दि २२ रोजी प्रांताधिकारी डॉ थोरबोले यांच्या लेखी जबाबानुसार आपण स्वता: सदर गुन्ह्यात ३५३ आणि ३३२ कलम वाढविण्यात आले असल्याचे लेखी दिले. शासकीय कर्मचाऱ्यास बडतर्फ करने वरिष्ठांच्या हाती असून त्याबाबत आपण अहवाल देखील सादर केला असल्याचे यादव म्हणाले.
सदर घटनेच्या तपासात कर्जत पोलिसांनी कसलेही दिरंगाई केली नसून घटनेच्या दिवशी घेण्यात आलेली फिर्याद रितसर आहे. काल पुन्हा स्वता: प्रांताधिकारी यांच्या लेखी जबाबानुसार वरील दोन कलम लावण्यात आली असल्याचे आंदोलनकर्त्याना यादव यांनी सांगितले.
महसुल संघटना आक्रमक
सोमवारी याच घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या संघटनेने जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन देत निषेध केला. यावेळी प्रांताधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे, डॉ अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे, उमेश पाटील यांनी महसुल प्रशासनाच्या तीव्र भावना व्यक्त करीत त्या पोलीस कर्मचाऱ्यांस तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली.
प्रांताधिकारी यांचा जबाब आणि वैद्यकीय चाचणीचा अहवाल
मंगळवारी पोलीस उपनिरीक्षक सतीश गावित यांनी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांचा प्रांत कार्यालयात जाऊन जबाब नोंदविला. यासह शुक्रवारी वाळूतस्कर पोलीस कर्मचारी व्हरकटे याने केलेल्या मारहाणीतील जखमेचा वैद्यकीय अहवाल थोरबोले यांनी पोलीस उपनिरीक्षक गावित यांच्याकडे जमा केला. थोरबोले यांना सदर घटनेत सह फिर्यादी करण्यात आले आहे.
थोरबोले साहेब त्याच दिवशी आपण फिर्याद का दाखल केली नाही ?
प्रांताधिकारी कारवाई करीत असताना पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याने डॉ अजित थोरबोले यांना शिवीगाळ केल्याची फिर्याद घटनेच्या दिवशी खेडचे तलाठी दीपक बिरुटे यांनी दाखल केली होती. दोन दिवसांनी पुन्हा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी लेखी जबाब देत आपणांस मारहाण आणि आपल्या शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा दावा केला. मग त्याच दिवशी ही घटना फिर्यादीत का नमुद केली नाही ? हा सवाल आता उपस्थित होत आहे.