कर्जत Video : आमदार प्रा राम शिंदे रमले वारकऱ्यांच्या सेवेत, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे जंगी स्वागत,पांडुरंगा.. पेरण्या रखडल्यात ; पावसाचं आगमन लवकर व्हावं – आमदार राम शिंदे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । राज्यभरातील पायी दिंड्या पांडुरंगाच्या भेटीस पंढरीच्या दिशेने आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari 2023) रवाना झाल्या आहेत.गावोगावचे वारकरी खांद्यावर भगव्या पताका, हाती टाळ मृदुंग आणि विठूनामाचा जयघोष करत दिंड्यांमध्ये रममाण झाले आहेत.अवघा महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात दंग झाला आहे.
असेच भक्तीमय वातावरण कर्जत – जामखेड मतदारसंघात आहे.या भागातून राज्यातील अनेक मोठ्या दिंड्या पंढरीच्या दिशेने जात आहेत. यामध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी पालखी सोहळ्याचा समावेश आहे. (Saint Shreshtha Nivrutinath Maharaj payi Dindi Palkhi Sohala 2023)
हजारो वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी दरवर्षी कर्जत तालुक्यात मोठा उत्साह असतो. रविवारी 18 जून 2023 रोजी कर्जत तालुक्यातील मिरजगाव याठिकाणी आमदार प्रा.राम शिंदे आणि मिरजगाव ग्रामस्थांनी या दिंडीचे जंगी स्वागत केले.
आमदार राम शिंदेंनी केली वारकऱ्यांची सेवा
मिरजगावमध्ये दिंडी दाखल होताच आमदार प्रा.राम शिंदे पालखीचे दर्शन घेतले. पालखी खांद्यावर घेत आमदार राम शिंदे काही काळ दिंडीत चालले. त्यानंतर शिंदे यांनी मिरजगाव येथील तरूणांसह सामाजिक संघटनांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उभारलेल्या चहा- बिस्कीट, औषधी स्टाॅलला भेट देऊन त्यांनी वारकऱ्यांना चहा बिस्किट औषधांचे वाटप करत वारकऱ्यांची सेवा केली.
हाती टाळ घेत आमदार राम शिंदे रमले दिंडीत
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जाईपर्यंत आमदार प्रा.राम शिंदे व स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ हजारो वारकऱ्यांच्या सोबत दिंडीत सहभागी झाले. दिंडीत पायी चालत असताना आमदार शिंदे यांनी अनेक वारकऱ्यांशी संवाद साधला.
मुक्कामाच्या ठिकाणी पालखीचे आगमन झाल्यानंतर मिरजगाव ग्रामस्थांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. हाती टाळ घेत आमदार राम शिंदे दिंडीत चांगलेच रममाण झाले होते. आरती संपल्यानंतर आमदार राम शिंदे निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी वारकऱ्यांच्या वतीने आमदार राम शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.
हजारो वर्षांची परंपरा ऊर्जा आणि शक्ती देणारी
ऊन – वारा- पाऊस, तहान भूक याची कसलीही तमा न बाळगता भक्तिभावाने, श्रध्देने पालख्या पाडुरंगाच्या भेटीसाठी पायी निघाले आहेत.हीच खरी महाराष्ट्राची ओळख आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज मिरजगाव गावात ग्रामस्थांसमवेत स्वागत केले. निवृत्तीनाथाचं दर्शन घेतलं, निवृत्तीनाथांच्या पालखीला खांदा दिला. शेकडो वर्षांच्या या परंपरेचं साक्षीदार होण्याचं भाग्य आज मला मिळाले. ही परंपरा ऊर्जा आणि शक्ती देणारी आहे. त्यामुळे मला देखील अतिशय आनंद झालाय की, मी या पालखी सोहळ्यात सहभागी झालो, अशी भावना यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केली.
पांडुरंगा आमच्या पेरण्या रखडल्यात, तरी लवकरात लवकर पावसाचं आगमन व्हावं
यंदा मृगाच्या पावसाला उशिर झालाय, त्यामुळे मी निवृत्तीनाथाच्या व विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो की, आता पावसाला खूप उशिर व्हायला लागलाय, आमच्या पेरण्या रखडल्यात, तरी लवकरात लवकर पावसाचं आगमन व्हावं, तसेच जे वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेत त्यांना कुठलाही त्रास न होता ते सुखरूपपणे विठ्ठलाच्या दारात पोहचावेत अशी मनोकामना करतो, असे म्हणत आमदार राम शिंदे विठ्ठलाकडे पावसाचे साकडे घातले.
दरम्यान, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आगमन मिरजगाव मध्ये रविवारी होणार असल्याने या दिंडी सोहळ्याच्या स्वागतासाठी कर्जत तालुका प्रशासन झाले होते.वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये याची सर्वोतोपरी काळजी घेण्यात आली होती.
यावेळी बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, संपत बावडकर, तहसिलदार गणेश जगदाळे, पोलिस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, पं.स.कृषी अधिकारी रुपचंद जगताप, सरपंच सौ. सुनिता नितीन खेतमाळस, उपसरपंच संगिता वीरपाटील, नितीन खेतमाळस, ग्रामविकास अधिकारी सदाशिव आटोळे सह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.