Karjat Nagar Panchayat election 2021 | सलग तिसर्‍या दिवशी उमेदवारांनी फिरवली पाठ : आघाडी – युती की स्वबळ काथ्याकूट सुरू !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Karjat Nagar Panchayat election 2021 | कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या तीन दिवशी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याने आता अनेक तर्क वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

मागील तीन दिवसांपासून इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्याकडे पाठ फिरवलेली दिसत आहे.आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोनच दिवस बाकी असून सोमवारी आणि मंगळवारी अर्ज दाखल करण्याकरीता मोठी झुंबड उडणार आहे.

कर्जत नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून मागील तीन दिवसांपासून १७ प्रभागासाठी एक ही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली. दि १ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र मागील तीन दिवसांपासून इच्छुक उमेदवारांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.

सलग दोन दिवस सुट्ट्या

उद्यापासून दोन दिवस शासकीय सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोनच दिवस बाकी असून या दोन दिवसात इच्छुक उमेदवारांची मोठी झुंबड उडणार आहे. प्रशासन सज्ज असून प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नानासाहेब आगळे आणि मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या सहकार्याने आठ टेबलवर उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील.

 Karjat Nagar Panchayat election 2021

महाविकास आघाडी की युती ? अथवा स्वबळ याबाबत अजून संभ्रम

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोनच दिवस राहिले असून कर्जत नगरपंचायतीमध्ये निवडणुकीस सामोरे जाण्यासाठी सर्वच राजकीय पक्षात आजमितीस तरी कमालीची शांतता दिसत आहे.

महाविकास आघाडी करून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येतात की ? स्वबळाचा नारा देत निवडणुक लढवितात याबाबत गोपनीयता पहावयास मिळत आहे. भाजपाने आपल्या इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेतल्या असून सध्या तरी त्यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. मात्र विद्यमान असणारे नगरसेवक आणि भावी असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठी-भेटीवर भर देत आपल्या पातळीवर चाचपणी सुरू केली आहे.

उमेदवार निवडताना होणार मोठी कसरत

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार विरूध्द माजी मंत्री राम शिंदे असा थेट सामना रंगणार आहे. या निवडणुकीत  पवार व शिंदेंना उमेदवार निवडताना मोठी कसरत करावी लागणार आहे. इच्छूकांची मोठी संख्या दोन्ही नेत्यांच्या राजकीय कौशल्याची कसोटी पाहणारी ठरू शकते असेच सध्याचे चित्र आहे.