कर्जतकरांचा नादच खुळा, 11 महिलांच्या हाती नगरपंचायतच्या सत्तेची सूत्रे, कर्जतच्या निकालाची राज्यभर चर्चा !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | सत्तार शेख | कर्जत नगरपंचायत निवडणुकीचा निकाल (Karjat Nagar Panchayat Election Results) आज समोर आला. या निवडणुकीत कर्जतकरांनी सत्तांतर घडवले. राष्ट्रवादी व काँग्रेस (NCP Congrees win) आघाडीकडे एकहाती सत्ता सोपवली. मात्र या निकालाचे सर्वाधिक लक्षवेधी वैशिष्ट्ये म्हणजे कर्जतकर जनतेने नगरपंचायती सुत्रे 11 महिलांच्या हाती सोपवली. कर्जतकरांच्या या राजकीय कौलाची चर्चा आता राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. (Karjat Nagar Panchayat election results, 11 women corporators, 6 male corporators)

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) व माजी मंत्री राम शिंदे BJP Ram Shinde) यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. या निवडणुकीत कोण बाजी मारणार यावर पुढचे राजकीय समीकरणे ठरणार होती. म्हणूनच दोन्ही नेत्यांनी ऐडीचोटीचा जोर लावत राजकीय धुराळा उडवून दिला होता.

राज्याच्या राजकारणात या निवडणुकीची जोरदार चर्चा रंगली होती. सोशल मिडीया ते स्थानिक या टप्प्यावर पवार विरूध्द शिंदे हा संघर्ष उफाळून आला होता. अखेर पवारांनी पुन्हा एकदा शिंदेंना अस्मान दाखवत मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली.

पवार विरूध्द शिंदे हा राजकीय संघर्ष जितका राज्याच्या राजकारणात चर्चेचा ठरला त्याहून आता निकालाची मोठी चर्चा रंगली आहे. कर्जत नगरपंचायतचा आज निकाल समोर आला. या निकालात कर्जतकरांनी सर्वाधिक महिला उमेदवार निवडून देत नवा कौल दिला आहे.

कर्जत नगरपंचायतची 17 जागेची मतमोजणी आज पार पडली यात 11 महिला निवडून आल्या आहेत. तर सहा पुरूष निवडून आले आहेत. महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. परंतू कर्जतकरांनी नवा राजकीय कौल देत कर्जतमध्ये 11 महिलांना निवडून देत 65 टक्के आरक्षण बहाल केले आहे. कर्जतकर जनतेने दिलेल्या या राजकीय कौलाचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेले 11 महिला उमेदवार खालील प्रमाणे

1) उषा अक्षय राऊत,  2) छाया सुनिल शेलार, 3)  ताराबाई सुरेश कुलथे, 4) प्रतिभा नंदकिशोर भैलूमे 5) मोहिनी दत्तात्रय पिसाळ , 6) सुवर्णा रविंद्र सुपेकर  7) ज्योती लालासाहेब शेळके , 8) अश्विनी गायकवाड , 9) रोहिणी सचिन घुले, 10) मोनाली ओंकार तोटे, 11) लंकाबाई देविदास खरात 

महिला नगराध्यक्ष होणार का ?

ज्या 11 महिला नगरसेवक निवडून आल्या आहेत त्यात भाजपच्या 2, काँग्रेसच्या 2 तर राष्ट्रवादीच्या 7 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे नगराध्यक्ष निवडीत महिलांच्या संख्याबळाचा विचार करूनच नगराध्यक्ष निवडला जाईल अशीच चर्चा रंगू लागली आहे. परंतू आमदार रोहित पवार काय निर्णय घेणार यावरच सर्व अवलंबून असणार आहे.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेले पुरूष उमेदवार खालील प्रमाणे

1) नामदेव देवा राऊत, 2) सतिश उध्दवराव तोरडमल, 3) भाऊसाहेब सुधाकर तोरडमल, 4) अमृत श्रीधर काळदाते, 5) संतोष सोपान मेहेत्रे 6) भास्कर बाबासाहेब भैलूमे

कर्जतकर जनतेने तब्बल 11 महिलांना नगरपंचायतचा कारभार करण्यासाठी निवडले आहे. या 11 नवनिर्वाचित महिला नगरसेवकांना स्वतंत्र कारभार करण्याचे स्वातंत्र्य दिल्यास कर्जत शहरात विकासाची नवी गंगा वाहू लागेल अशी प्रतिक्रिया जनतेतून येऊ लागली आहे.