जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । माजी मंत्री प्रा राम शिंदे हे विधानपरिषदेवर गेल्यापासून कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राजकीय चित्रच पालटून गेले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. गेल्या अडीच तीन वर्षांत बॅकफूटवर असलेली भाजपा जोरदार सक्रीय झाली आहे. तसेच आमदार राम शिंदे हेही आता आक्रमकपणे डावपेच खेळताना दिसत आहेत. मतदारसंघात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार आहे. अशी कुजबुज राजकीय पटावर आहे, अश्यातच सोमवारचा दिवस एका भेटीमुळे मतदारसंघात चर्चेत आला आहे.
कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत यांचे वडिल चंद्रकांत राऊत व आई भामाबाई राऊत यांनी अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे. राऊत दाम्पंत्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आमदार प्रा राम शिंदे हे आपल्या मातोश्री भामाबाई शंकर शिंदे यांना घेऊन सोमवारी राऊत यांच्या निवासस्थानी पोहचले.
यावेळी आमदार राम शिंदे आणि त्यांच्या मातोश्री भामाबाई शंकर शिंदे यांनी चंद्रकांत राऊत व भामाबाई राऊत यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार केला.ऐकेकाळी आमदार प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले आणि सध्या राष्ट्रवादीत विराजमान असलेले कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत आणि आमदार राम शिंदे यांच्यातील कौटुंबिक जिव्हाळा अजूनही कायम आहे, याचेच दर्शन सोमवारी झाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, सुवर्णाताई राऊत, यांच्या कन्या सौ.भारती, कु.सायली राऊत, डॉ. अश्विनी राऊत व राऊत परिवारातील सदस्य तसेच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, पप्पूशेठ धोदाड, अण्णा म्हस्के, पांडुरंग क्षीरसागर ,राजेंद्र येवले व आदी उपस्थित होते. शिंदे यांनी राऊत दाम्पंत्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान सध्या राष्ट्रवादीत असलेले माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या निवासस्थानी आमदार राम शिंदे हे आपल्या मातोश्रींना घेऊन पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. राऊत पुन्हा स्वगृही परतणार का? अशी चर्चा आता मतदारसंघात चर्चेत आली आहे. शिंदे आणि राऊत या दोन्ही कुटूंबाचे ऋणानुबंध आजही कायम असल्याचे आजच्या भेटीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे अगामी काळात राजकीय पटावर काहीही घडू शकतं, असा अंदाज आता राजकीय अभ्यासक वर्तवू लागले आहेत.
दरम्यान, आमदार राम शिंदे यांनी राऊत यांच्या निवासस्थानी दिलेली भेट कौटुंबिक होती, मात्र या भेटीतून अगामी राजकारणाची साखर पेरणी झाली आहे. या साखर पेरणीचे राजकीय पडसाद भविष्यात मतदारसंघात उमटताना दिसल्यास नवल वाटू नये, असाच अर्थ आता शिंदे – राऊत भेटीतून काढला जाऊ लागला आहे.