कर्जत । अफरोज पठाण। कर्जतचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले (Dr Ajit Thorbole) यांना शिवीगाळ करणाऱ्या वाळतस्कर पोलिस कर्मचाऱ्यासह आणखी एका विरोधात कर्जत पोलिस स्टेशनला (Karjat Police Station) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी खाकीतील दुसरी बाजू समोर आल्याने संपुर्ण तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
कर्जतचे डीवायएसपी आण्णासाहेब जाधव व पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गेल्या काही महिन्यात अनेक धडक कारवाया करत सर्वसामान्य जनतेत पोलिस दलाची चांगली छबी निर्माण केली होती. जाधव व यादव हे दोन्ही अधिकारी सामान्य नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. परंतू शुक्रवारी एका पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या प्रतापामुळे सामान्य जनतेत कर्जत पोलिसांविषयी चुकीचा संदेश गेला आहे.
शुक्रवारी नेमकं काय घडलं ?
शुक्रवार, दि १९ रोजी सकाळी ७:२७ च्या सुमारास कर्जत शहरातील बालाजीनगर या ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करणारा एक टीपर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या निदर्शनास आला होता. थोरबोले यांनी सदर बाब तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या कानावर टाकली. आगळे यांनी तात्काळ तलाठी दीपक बिरुटे, रवींद्र लोखंडे, धुळाजी केसकर आणि मंडळ अधिकारी बाळासाहेब सुद्रीक यांच्या पथकाला नियोजित ठिकाणी रवाना केले होते. महसुल पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी एमएच १२ आरएन ४७०४ हा टीपर आढळून आला होता.
सदर टीपरची महसुल पथकाने पाहणी केली असता त्यात जवळपास तीन ब्रास वाळू असल्याचे आढळून आले होते. महसुल पथकाने सदर टीपर थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी एका चारचाकी गाडीजवळ निळा पांढऱ्या रंगाचा टीशर्ट परिधान केलेल्ता इकेशव व्हरकटे याने आपण स्वता: पोलीस असून टीपर खाली करून देण्यास सहकार्य करावे असे सांगितले.
दोघांविरोधात गुन्हे दाखल
मात्र प्रांताधिकारी डॉ थोरबोले यांनी सदर टीपर प्रांत कार्यालयात जमा करावे असे आदेश सोडले. यावेळी थोरबोले यांनी यासर्व घटनेचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये सुरू केले होते. पोलीस कर्मचारी असणारा केशव व्हरकटे याने त्यास अडथळा आणत चक्क प्रांताधिकारी थोरबोले यांना दमबाजी, शिवीगाळ केली. आणि सदरच्या टीपरमधील वाळू खाली करीत टीपर घेऊन पळून गेला. टीपर चालक अज्ञात इसम आणि निळा पांढरा टीशर्ट नामक पोलीस कर्मचारी सांगणारा केशव व्हरकटे याच्यावर तलाठी दीपक बिरुटे यांच्या फिर्यादीनुसार भादवी कलम ३७९, १८६, ५०४, ३४ भारतीय पर्यावरण कायदा ३, १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे पुढील घटनेचा अधिक तपास करीत आहे.
पोलिस दलात किती वाळूतस्कर कर्मचारी ?
पोलीस उपअधीक्षक कार्यालयात कार्यरत असणारा पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे हा वाळू तस्कर असल्याचे शनिवारी उघडकीस आले. कायद्याचे ज्ञान असणाऱ्या व्हरकटे याने चक्क प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनाच शिवीगाळ करीत अवैध वाळू वाहतूक करणारा टीपर अक्षरशा: त्यांच्या नाकावर टिचून पळवून नेला. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांस अडथळा आणून शिवीगाळ करणे एवढी मजल जातेच कशी ? त्या पोलिस कर्मचाऱ्याला नेमका आशिर्वाद कुणाचा ? अशी चर्चा दिवसभर कर्जत शहरात सुरू होती. तसेच कर्जत पोलीस दलात आणखी किती वाळूतस्कर कर्मचारी असतील याचा उलगडा पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी करणे आवश्यक आहे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून पुढे येत आहे.
यादव साहेब ‘तो’ ट्रक कधी आणणार ? – महसुल कर्मचाऱ्यांची मागणी
दि ६ मार्च २०२१ रोजी कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे आणि त्यांच्या पथकाने बारडगाव सुद्रीक शिवारात एक अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. सदरचा ट्रक(एमएच १२ केपी ००४६) पथकाने प्रांत कार्यालयाच्या आवारात आणून जमा करीत पुढील कारवाईसाठी सीनानदी परिसरात गेले होते. पहाटेच तो ट्रक प्रांत कार्यालयाचे गेट तोडून पळवून नेण्यात आला होता. याबाबत रीतसर गुन्हा दाखल केला असताना देखील आजमितीस देखील तो ट्रक कर्जत पोलिसांना सापडलेला नाही हे विशेष. नेमकं पाणी कुठं मुरतंय असा सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.