कर्जत : भोसे गावातील मुस्लीम समाजाचा गेल्या अनेक वर्षांंपासूनचा प्रश्न लागला मार्गी, मुस्लिम समाजाने मानले जिल्हाधिकाऱ्यांचे आभार !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । कर्जत तालुक्यातील भोसे गावातील मुस्ली दफनभूमीसाठी (कब्रस्थान) जागा उपलब्ध व्हावी यासाठी सरकार दरबारी सुरु असलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा सुरु होता. सरकारने भोसे गावातील मुस्लीम समाजाच्या दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.याबाबतचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या स्वाक्षरीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे भोसे गावातील मुस्लिम समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गेल्या अनेक पिढ्यांपासून कर्जत तालुक्यातील भोसे गावात मुस्लिम समाजाची 40 च्या आसपास कुटूंबे वास्तव्यास आहेत. साधारणता: 150 च्या आसपास लोकसंख्या असलेल्या येथील मुस्लिम समाजाला हक्काची दफनभूमी नव्हती. दफनभूमी नसल्यामुळे मुस्लिम कुटूंबातील मयत व्यक्तीचा दफनविधी कुठे करायचा असा प्रश्न नेहमी निर्माण व्हायचा. मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानसाठी हक्काची जागा मिळावी यासाठी मुस्लिम सेवा संघाचे तालुकाध्यक्ष लतिफभाई शेख यांनी ग्रामपंचायत पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाठपुरावा सुरु केला होता.
भोसे गावातील मुस्लिम समाजाला दफनभूमी साठी हक्काची जागा असावी यासाठी मुस्लिम सेवा संघाचे तालुकाध्यक्ष लतिफभाई शेख यांनी ग्रामपंचायत मार्फत सदर मागणीचा प्रस्ताव कर्जत तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला होता. सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे शेख यांनी मुस्लीम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष निसारराजे सय्यद आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उबेदभाई शेख यांना संपर्क साधत भोसे गावातील मुस्लीम समाजाची कैफियत मांडली. सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती.
मुस्लीम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष निसारराजे सय्यद आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उबेदभाई शेख यांनी भोसे गावचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेत प्रशासकीय अडचणी दुर व्हाव्यात यासाठी जोरदार पाठपुरावा केला.भोसे येथील मुस्लिम ग्रामस्थांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना यश आले.आज निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी भोसे गावातील मुस्लिम दफनभूमीसाठी जागा देण्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतलेल्या निर्णयाच्या आदेशाची प्रत भोसे येथिल मुस्लिम समाज बांधवांच्या हाती दिली.
यावेळी मुस्लीम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष निसारराजे सय्यद, मुस्लीम सेवा संघाचे तालुकाध्यक्ष लतिफभाई शेख, सामजिक कार्यकर्ते चांद पापाभाई शेख, अब्बास शेख, युवक नेते शाहिदभाई शेख व इतर नागरिक उपस्थित होते.
सरकारचे मनापासुन आभार
गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या गावात मुस्लिम समाजासाठी हक्काची दफनभूमी नव्हती.मुस्लिम समाजाच्या दफनविधीसाठी हक्काची जागा देण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी,कर्जत तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले.तसेच आमचे नेते निसारराजे सय्यद व उबेदभाई शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.जिल्हाधिकारी कार्यालयाने आमचा अनेक वर्षांचा प्रश्न आज मार्गी लावला.यामुळे समाजात आनंदून गेला आहे. प्रशासनाचे तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ साहेबांचे मनापासून आभार ! – लतिफभाई शेख – तालुकाध्यक्ष, मुस्लिम सेवा संघ, कर्जत