Kolhapur News : वधू-वर सुचक केंद्र चालकाने केले धक्कादायक कृत्य, भावी नवरदेवाला गाठावे लागले पोलिस ठाणे, नेमकं काय घडलं वाचा सविस्तर !
कोल्हापूर, 30 जून 2023 : सध्या लग्न जमवण्याच्या बहाण्याने फसवणुकीच्या घटनांमध्ये राज्यभरात वाढ झाली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात अश्या टोळ्या सक्रीय आहेत. विशेष म्हणजे लग्नानंतर तरूणी पैसे आणि दागिणे घेऊन पोबारा करत असल्याच्या घटना वाढल्या आहेत, परंतू याहूनही एक धक्कादायक घटना कोल्हापुरातून समोर आली आहे. लग्न जमवण्याच्या बहाण्याने तरूणाच्या घरी गेलेल्या वधू वर सुचक केंद्र चालकाने तरूणाला मोठा चुना लावला आहे. या घटनेत वधू वर सुचक केंद्र चालकाने लाखोंच्या दागिण्यांवर डल्ला मारल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर (Kolhapur News) शहरातील फुलेवाडी रिंग रोड येथील एका तरुणाला नियोजित वधू दाखवण्याच्या बहनाने वधू वर सूचक सेंटर चालक त्याच्या घरी गेला होता. यावेळी त्याने संबंधित तरुणाच्या घरातून पाच लाख 54 हजार रुपयांचे 12 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या चौकशीतून हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
या प्रकरणी पोलिसांनी केंद्र चालक रोहन रवींद्र चव्हाण (Rohan Ravindra Chavhan) याला अटक केली असून त्याच्याकडून दागिने आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. फुलेवाडी रिंग रोड येथील अयोध्या कॉलनीतील विपुल चौगुले (Vipul choughule) यांच्या घरी हा प्रकार घडला होता. (Crime News)
चोरट्याने तिजोरीतील १२० ग्रॅम सोन्याचे दागिने व अन्य साहित्य लंपास केले होते. दरम्यान या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या चोरीचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस करत होते.
यावेळी पोलिसांना वधू वर सूचक सेंटर चालकानेच हा डल्ला टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, या प्रकरणी एकाला अटक केली असून 12 तोळे दागिनेही हस्तगत केले आहेत. (Latest Marathi News)