Kopargaon News : पेट्रोल पंप मॅनेजर हत्या प्रकरणात समोर आली मोठी घडामोड, पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या
जामखेड टाइम्स वृत्तसेवा, 30 जून 2023 : कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील गुरुराज एच पी पेट्रोल पंपाच्या मॅनेजरची किरकोळ वादातून हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती.या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. पोलिसांनी दोघा संशयित मारेकऱ्यांना बेड्या ठोकण्याची धडाकेबाज कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे.(Kopargaon latest news)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील गुरुराज एच पी पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्री 7 वाजेच्या सुमारास तिघे अज्ञात तरूण पेट्रोल भरण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांचा पेट्रोल पंपावरील कर्मचारी अमोल धोंडीराम मोहिते यांच्याशी वाद झाला. मोहिते यांना तिघांनी धक्काबुक्की करत मारहाण केली. त्याचवेळी हा वाद सोडवण्यासाठी पेट्रोल पंपावरील मॅनेजर भोजराज बाबूराव घनघाव (वय 40) यांनी मध्यस्थी केली पण हा वाद आणखीन वाढला.
या वादाचे रूपांतरण हाणामारीत झाले. यावेळी संतापलेल्या अज्ञातांनी धारधार शस्त्राने सपासप वार करून मॅनेजरची हत्या केली होती. तसेच पंपाजवळील हाॅटेलमधील कर्मचारी दत्तात्रय मोरे हाही या हल्ल्यात जखमी झाला होता. त्याच्यावर शिर्डी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना उघडकीस येताच अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.
गुरुराज एच पी पेट्रोल पंपाचे मॅनेजर भोजराज बाबूराव घनघाव (वय 40) यांच्या हत्येचा सीसीटिव्ही व्हिडीओ शुक्रवारी समोर आला होता, पोलिसांनी सीसीटिव्ही व्हिडीओच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध जारी केला होता. दिवसभर पोलिसांनी वेगाने तपास करत दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार एकाला नाशिक तर एकाला शिर्डी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती शिर्डीचे पोलिस उप अधीक्षक संदिप मिटके यांनी दिली आहे. तिसऱ्या आरोपीलाही लवकरच पकडले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास कोपरगावचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले हे करत आहेत.