कुसडगाव एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र जाणार दुसरीकडे ? जामखेड तालुक्यात पसरली अस्वस्थता, भाजपच्या अट्टाहासाविरोधात रोहित पवारांचा संताप !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। कर्जत-जामखेड मतदारसंघात महाविकास आघाडी सरकारने मंजुर केलेले राज्य राखीव पोलिस बल गट (एसआरपीएफ) प्रशिक्षण केंद्र’ पुन्हा भुसावळ तालुक्यातील वरणगावला हलविण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्या आहेत. यामुळे जामखेड तालुक्यात मोठी अस्वस्थता पसरली आहे. भाजपकडून सुरू असलेल्या या राजकारणावर आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कुसडगाव येथे राज्य राखीव पोलिस बल गट (एसआरपीएफ) प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामासाठी ३४ कोटी ३७ लाख रुपयांची निविदा मंजुर आहे. २२ जून २०२२ रोजी या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. सध्या सदर काम प्रगतीपथावर आहे. कुसडगाव राज्य राखीव पोलीस बलासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची भरती प्रक्रिय पूर्ण झाली आहे. त्यात निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण देखील सुरू आहे, मात्र हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा वरणगावला हलवण्याचा घाट घातला जात आहे. यामाध्यमांतून कर्जत जामखेडच्या जनतेवर भाजपकडून अन्याय करण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे -फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजुर असलेल्या कामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे.अश्यातच भुसावळचे भाजपा आमदार संजय सावकारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वरणगाव येथे प्रशिक्षण केंद्र होण्याबाबत पत्राद्वारे विनंती केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा ते प्रशिक्षण केंद्र वरणगाव येथे करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार गृह विभागाच्या पत्रव्यवहारातून कुसडगाव येथे सुरू असलेल्या कामाच्या स्थितीची, निधी वितरणाची व इतर माहिती मागवण्यात आली आहे. यामुळे सदरचे केंद्र पुन्हा वरणगावला हलविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
तांत्रिकदृष्ट्या पोलीस प्रशिक्षण केंद्र दुसरीकडे जाणं शक्य नाही आणि दबाव आणून जर कोणी नेण्याचा प्रयत्न केला तर ते देखील आम्ही होऊ देणार नाही. पण अशा पद्धतीने एखादी गोष्ट मतदारसंघात आली असेल आणि विरोधी आमदाराला त्याचं श्रेय जाऊ नये म्हणून भाजपची लोकं अशा प्रकारचे काम रद्द करणार असतील तर हे विकासाच्या विरोधात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.
जामखेड तालुक्यात पसरली अस्वस्थता
दुष्काळी जामखेड तालुक्यात एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्रासारखी महत्वाची संस्था जामखेड तालुक्यात आली होती. हे केंद्र जामखेड तालुक्याला राज्याच्या नकाशावर घेऊन जाण्यासाठी महत्वाचे आहे. या केंद्राच्या माध्यमांतून स्थानिक बाजारपेठेत याचा मोठा फायदा होणार आहे. हे केंद्र हलविण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरु झाल्याने तालुक्यात मोठी अस्वस्थता पसरली आहे.
आमदार राम शिंदे काय भूमिका घेणार ?
जामखेड तालुक्यातील कुसडगांव येथील एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र हलविण्याच्या हालचाली सुरु झाल्याने जामखेड तालुक्यात अस्वस्थता पसरली आहे. जामखेड तालुक्यावर अन्याय होऊ नये यासाठी आमदार राम शिंदे काय भूमिका घेतात याकडे जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे. राम शिंदे हे सत्ताधारी भाजप गटाचे आमदार आहेत. त्यांच्या शब्दांला सरकारमध्ये मोठे वजन आहे. याच माध्यमांतून शिंदे हे जामखेडकरांना दिलासा देणार का ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.