इंडियन ऑइल कॉर्पोरेशन निधीतून खर्डा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होणार लाखोंची कामे, आमदार रोहित पवारांचा पुढाकार
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल खर्डा येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सीएसआर निधीमधून विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सोयीसाठी लाखोंची कामे करण्यात येणार आहेत. त्याचा भूमिपूजन सोहळा शनिवारी आमदार रोहित पवार आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी यांच्या हस्ते पार पडला.
कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या वॉश प्रकल्पांतर्गत आयओसीएलच्या सीएसआर निधीतून जवळपास 30 लाख रुपयांची विविध कामे करण्यात येणार आहेत ज्यामध्ये विदयार्थ्यांना स्वच्छ पेयजल उपलब्ध करणे, अत्याधुनिक स्वच्छतागृहे आणि हात धुण्याचे स्थानक यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
खर्डा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे होणाऱ्या या कामासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर निधीची मदत होत आहे. विद्यालयातील एकूण 2300 विद्यार्थी व विद्यार्थिनींना याचा थेट फायदा होणार आहे. आधुनिक शौचालय, पेयजल व हात धुण्याच्या स्थानकाव्यतिरिक्त बसण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आसन व्यवस्था आसन व्यवस्थेकडे जाण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा रस्ता इत्यादी कामांचा देखील यामध्ये समावेश आहे.
ही कामे दर्जेदार आणि चांगल्या प्रतीची झाली पाहिजे याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार यांच्यासह इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे वरिष्ठ निर्माण प्रबंधक श्री.मूर्ती, निर्माण प्रबंधक श्री.लोखंडे व सहाय्यक प्रबंधक अस्वनी कुमार यांची उपस्थिती होती.
यासोबतच खर्डा येथील सीताराम बाबा गडावर बसवण्यात आलेल्या भगवान विष्णू यांच्या मूर्तीला लागणारा सर्व निधी आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मठाचे प्रमुख ह.भ.प महालिंग महाराजांना सुपूर्द केला.