कर्जत तालुक्यात बिबट्या झाला आक्रमक :  बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी तर कुत्रा ठार 

कर्जत  : कर्जत तालुक्यात मागील महिन्यात बिबट्याने एका शेतकऱ्यांवर हल्ला करण्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील एका वस्तीवर बिबट्याने  वासरू आणि कुत्र्यावर हल्ला करण्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी मोहन शेळके यांनी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणी आढळून आलेल्या पायाच्या ठस्यावरून तो बिबट्याच असण्याची शक्यता शेळके यांनी वर्तवली असून त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्यावतीने कोरेगाव परिसरात सापळा लावण्यात येईल अशी माहिती दिली.

याबाबत सविस्तर असे की, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कोरेगाव (ता कर्जत) येथील वस्तीवर एका गायीच्या वासरूवर आणि पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. यामध्ये कुत्रा गतप्राण झाला असून वासराला चावल्याच्या खुणा आहेत. सकाळी कर्जत वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी घटनास्थळी भेट देत शेतकऱ्यांशी चर्चा केली. लगत उसाचे क्षेत्र असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन केले.

पायाच्या ठस्या वरून सदर हल्ला करणारा प्राणी बिबट्याच असल्याचे शेळके यांनी दुजोरा दिला. बिबट्याच्या शोधमोहिमेसाठी वनविभागाने पथके नियुक्ती केले असून कोरेगाव परिसरात बिबट्यास जेरबंद करण्यासाठी सापळा लावण्यात येईल अशी माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी डोंबाळवाडी येथे बिबट्या आढळून आला होता.आता कोरेगावमध्ये बिबट्या सक्रीय झाल्याने शेतकरी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.