शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात महायुती सरकारची मोठी कारवाई, कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित, आमदार राम शिंदेंचा दणका !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । सीना धरणातील पाणी साठ्याची चुकीची माहिती देऊन शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात महायुती सरकारने मोठी कारवाई केली आहे. कुकडी पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्यावर शासनाने निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई केली आहे. टंचाई आढावा बैठकीत देशमुख यांनी चुकीची माहिती दिली होती. यावरून आमदार प्रा.राम शिंदे आक्रमक झाले होते. देशमुख यांच्यावरकारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली होती. आमदार राम शिंदे यांच्या दणक्यामुळे देशमुख यांच्यावर मोठी कारवाई झाली.
अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात दि 12 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय टंचाई बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार प्रा राम शिंदे यांनी सीना धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडावे अशी मागणी केली होती. त्यावेळी कुकडी पाटबंधारे विभाग क्र 2 चे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी शासनाची दिशाभूल करणारी माहिती या बैठकीत दिली असता. आमदार प्रा राम शिंदे यांनी बैठकीत आक्रमक पवित्रा घेतला होता.
सीना धरणात पाणी शिल्लक असतानाही कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरले. जनतेसह शासनाची दिशाभूल केली. शेतकऱ्यांचे नुकसान केले. शासनाच्या विरोधात चिड निर्माण होईल असे कृत्य केल्याचा मुद्दा शिंदे यांनी टंचाई बैठकीत उपस्थित करत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली होती. त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले होते.
टंचाई आढावा बैठक होऊन आठ दिवस उलटले तरी कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्यावर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ आमदार प्रा राम शिंदे यांनी आक्रमक होत 20 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण करण्याचा इशारा दिला होता. पाणी प्रश्नांवरून नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या आमदार प्रा राम शिंदे यांचे संभाव्य अंदोलन विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामुळे रद्द झाले. सरकारने आमदार प्रा राम शिंदे यांच्या मागणीची दखल घेत कुकडीचे श्रीगोंदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे.
कुकडीच्या श्रीगोंदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्यावर महायुती सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबतचा आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव डाॅ सुदिन गायकवाड यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्या कार्यालयात दि.१२.२.२०२४ रोजी टंचाईबाबत आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीत लोकप्रतिनिधी यांनी सीना धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी केली असता किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र.२, श्रीगोंदा हे लोकप्रतिनिधी यांना वस्तुस्थितीदर्शक माहिती अवगत करू शकले नाहीत. परिणामी लाभक्षेत्रातील लोकप्रतिनधी यांचेशी आवर्तनाबाबत योग्य समन्वय न झाल्याचे जिल्हाधिकारी, अहमदनगर व कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्या अहवालावरून दिसून येत आहे.
सबब, किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्याविरूध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४(१) (अ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करुन श्री. किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र.२, श्रीगोंदा, यांना शासन सेवेतून शासन तात्काळ निलंबित करीत आहे आणि पुढील आदेश काढले जाईपर्यंत ते निलंबित राहतील, असे आदेशात म्हटले आहे.
शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या आड येणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांविरोधात आमदार प्रा राम शिंदे हे नेहमी आक्रमक झाल्याचे दिसून येते. आमदार शिंदे यांनी विधानपरिषद आवाज उठवत 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यास सरकारला भाग पाडले होते. आता टंचाई काळात शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या कुकडीच्या श्रीगोंदा शाखेचे कार्यकारी अभियंता देशमुख यांच्यावर शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई झाली आहे. अधिकाऱ्यांनी जर शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला त्रास दिल्यास आमदार राम शिंदे यांच्याकडे सुट्टी नाही, हाच संदेश या कारवाईतून जनतेत गेला आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.