कर्जत : तुकाई उपसा सिंचन योजनेबाबत मंगळवारी मंत्रालयात होणार बैठक, आमदार प्रा राम शिंदे यांच्या मागणीची सरकारने घेतली दखल !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आमदार प्रा राम शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट अशी ओळख असलेल्या तुकाई उपसा सिंचन योजनेच्या कामात स्थानिक व प्रशासकीय अडथळे निर्माण झाले आहेत.सदर सिंचन योजनेचे काम गतीने व्हावे यासाठी आमदार राम शिंदे हे आग्रही आहेत.तुकाई उपसा सिंचन योजनेच्या कामातील तांत्रिक अडचणी दुर व्हाव्यात यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी सरकारचे लक्ष वेधताच राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी तुकाई उपसा सिंचन योजनेबाबत तातडीची बैठक बोलावली आहे. येत्या मंगळवारी ही बैठक मंत्रालयात होणार आहे, अशी माहिती भाजपचे कर्जत तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी दिली.

meeting will be held in ministry on Tuesday regarding Tukai Upsa irrigation scheme in Karjat taluka, Maharashtra government took note of MLA Ram Shinde's demand,

कर्जत तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या आमदार प्रा.राम शिंदे यांनी आपली राजकीय ताकद पणाला लावत 3 जानेवारी 2019 रोजी तुकाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळवण्यात यश मिळवले होते. 2 मार्च 2019 रोजी सदर योजनेच्या कामास सुरुवात झाली होती. या योजनेत 24 पाझर तलाव, 3 लघू पाटबंधारे तलाव यांचा समावेश आहे. या योजनेसाठी 115 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. सदर योजनेचा 20 पेक्षा अधिक गावांना थेट फायदा होणार आहे. या योजनेतून 599 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन आहे. सदर योजनेतून शेती आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होणार आहे.

आमदार प्रा.राम शिंदे यांनी मंत्री असताना मंजुर केलेली तुकाई उपसा योजनेच्या कामाला महाविकास आघाडीच्या काळात अघोषित स्थगिती होती. सदरच्या कामात तीन वर्षात कुठलीच प्रगती झाली नाही. वनविभागाची परवानगी नाही या सबबीखाली महाविकास आघाडी सरकारने या योजनेकडे दुर्लक्ष केले. गेल्या अनेक वर्षांपासून कर्जतकरांनी तुकाई उपसा सिंचन योजनेचे पाहिलेले स्वप्न आमदार रोहित पवार यांना गेल्या तीन वर्षांत पुर्ण करता आले नाही, रोहित पवार यांच्या दुर्लक्षामुळे सदर योजनेला खिळ बसली. गेल्या तीन वर्षांपासून सदर योजनेचे काम बंद होते, अशी खोचक टीका यावेळी शेखर खरमरे यांनी केली आहे.

परंतु वर्षभरापूर्वी आमदार प्रा राम शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यानंतर त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील रखडलेली विकासकामे व योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पुन्हा कंबर कसली. कर्जत तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारी तुकाई उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आमदार प्रा.राम शिंदे यांनी सरकार दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर योजनेच्या कामाला पुन्हा गती प्राप्त झाली. आमदार प्रा राम शिंदे यांच्या पुढाकारातून 13 फेब्रुवारी 2023 रोजी या योजनेचे काम पुन्हा सुरु करण्यात आले. वालवड येथे हा कार्यक्रम पार पडला होता.

सदर योजनेचे काम पुन्हा गतीने सुरु झाल्यानंतर काही स्थानिक व प्रशासकीय अडथळे आल्याने सदर योजनेचे काम रखडले. ही बाब निदर्शनास येताच आमदार राम शिंदे यांनी पुन्हा एकदा या योजनेकडे सरकारचे लक्ष वेधले. सदर योजनेतील तांत्रिक अडथळे दुर होऊन सदर योजना वेगाने पुर्ण करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. आमदार प्रा राम शिंदे यांनी केलेल्या मागणीची मृदू व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी गंभीर दखल घेत तुकाई उपसा सिंचन योजनेबाबत मुंबई तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक 10 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे.

कर्जत तालुक्यात सुरु असलेल्या तुकाई उपसा सिंचन योजनेच्या कामास येत असलेल्या तांत्रिक अडचणीबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक मृदू व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या दालनात पार पडणार आहे. या बैठकीसाठी आमदार प्रा राम शिंदे तसेच मृदू व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, भूसंपादन अधिकारी अहमदनगर, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी तथा अधीक्षक अभियंता नाशिक विभाग, सहाय्यक अधीक्षक अभियंता नाशिक विभाग, सर्व उपविभागीय जलसंधारण अधिकारी नाशिक विभाग, जिल्हा जलसंधारण अधिकारी अहमदनगर व कंत्राटदार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.

कर्जत तालुक्यातील जनतेसाठी महत्वपूर्ण असलेल्या तुकाई उपसा सिंचन योजना गतीने पूर्ण व्हावी, या योजनेतील तांत्रिक अडथळे दुर व्हावेत यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांच्या पुढाकारातून मृदू व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे आता संपुर्ण कर्जत तालुक्याचे लक्ष लागले आहे.