जामखेड टाइम्स वृत्तसेवा । मिरजगाव । 19 ऑगस्ट 2023 । कर्जत तालुक्यातील बेलगाव शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. बेलगाव येथील शरदेव वस्ती याठिकाणी बिबट्या दिसल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले असून परिसरात दहशत बसली आहे.
शरदेव वस्ती याठिकाणी राहत असलेल्या शेतकरी प्रकाश बाबर व त्यांची पत्नी कुसुम बाबर हे दोघे दाम्पत्य आपल्या घरासमोरील शेतातील गायीच्या गोठ्यात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गायीची प्रसुतीकरिता घरातून बाहेर आले असता, त्यांना ऊसाच्या शेतातून जात असलेला बिबट्या सदृश्य दिसणारा प्राणी दिसला. त्याला पाहताच हे दोघे दाम्पत्य घाबरून गेले. यावेळी त्यांनी शेजारील ग्रामस्थांना याबाबत सांगितले.
त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सरपंच दिपक भांबे, भैरवनाथ (भाऊ) शिंदे, उपसरपंच वैभव बाबर व ग्रामस्थांनी संपर्क करून याबाबत माहिती दिली. परंतु रात्रीची वेळ असल्याने आज शनिवारी सकाळी आलेल्या वनविभागाचे कर्मचारी आजिनाथ भोसले, बोबडे यांनी या शिवारातील शेतात पाहणी केली असता, यावेळी त्यांना ऊसाच्या शेतात बिबट्याचे पायाचे ठसे निदर्शनास आले. रात्री आलेला हा प्राणी बिबट्याच असल्याचे येथील उमटलेल्या ठशांवरून वनविभागाकडून सांगण्यात आले.
बेलगाव शिवारात बिबट्याच असल्याचे ठसे आढळल्याने याठिकाणी वनविभागाकडून पिंजरा लावण्याची मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे.
या भागात बिबट्याचा वावर असल्याचे वृत्त गावात व परिसरात वा-यासारखे पसरल्याने येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अहमदनगर शहरापाठोपाठ कर्जत तालुक्यातील बेलगाव शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक आपला जीव मुठीत ठेवून वावरताना दिसत आहेत.
“बेलगाव शिवारात बिबट्या आढळल्याचे समजते. त्याचे ठसे आढळल्याने नागरिकांनी भयभीत न होता सावधानता बाळगावी, रात्री शेतात जाताना सोबत बॅटरी असावी, मुलांनी एकटे जावू नये, सर्वांनी सतर्क रहावे, चुकीच्या अफवा कोणीही पसरवू नये, या शिवारात आणखीन बिबट्याचा वावर आढळल्यास पिंजरा लावण्यात येईल.”
सध्या पाऊस नसल्याने परिसर बदलून मानवी वस्तीकडे बिबट्या सारखे प्राणी मुक्तसंचार करून वावरत आहेत.याचा बंदोबस्त वनविभागाकडून होणे गरजेचे आहे. बिबट्याची नागरिकांत असलेली दहशत यामुळे अनेक नागरिक आता घरातून बाहेर जाण्यास ही घाबरू लागले आहेत. या भागात बिबट्या असल्याने पिंजरा लावून त्याला जेरबंद करण्याकरिता उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बेलगाव शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक घाबरून गेले आहेत. बिबट्याच्या पायाचे उमटलेले ठसे देखील आढळलेले आहे. वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा. गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी.