जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कृषि सहाय्यक ऐवजी सहाय्यक कृषि अधिकारी हे पदनाम करावे ही महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेची 10-12 वर्षांपासूनची मागणी होती. मी कृषी राज्यमंत्री असताना या विषयावर पाठपुरावा केला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कृषि सहाय्यकांच्या पदाच्या भरती संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर चर्चा सुरू असताना महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेची असलेली मागणी मी सभागृहात उपस्थित केली. त्याला कृषिमंत्री अब्दूल सत्तार यांनी सकारात्मक उत्तर दिलं, 15 दिवसांत विषय मार्गी लावण्याचा शब्द दिला. ज्या दिवशी हा निर्णय अंमलात येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने राज्यातील कृषि सहाय्यकांना न्याय मिळाला असं म्हणता येईल असे सांगत कृषि सेवकांच्या मानधन वाढीचा विषय मी लावून धरेल असे अश्वासन आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिले.
राज्यातील कृषी सहाय्यकांच्या पदनामाच्या प्रश्नांवर आमदार प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेत आवाज उठवत राज्यातील हजारो कृषि सहाय्यकांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांकडून आमदार प्रा राम शिंदे यांचा रविवारी चोंडीत सत्कार करण्यात आला. त्यावेळी आमदार प्रा.राम शिंदे बोलत होते.
राज्यातील कृषी सहाय्यकांचे पदनाम सहाय्यक कृषि अधिकारी करावे,ही मागणी आमदार प्रा राम शिंदे यांनी मार्गी लावल्यामुळे राज्यातील 8 ते 10 हजार कृषि सहाय्यकांना यामुळे न्याय मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी आज 26 मार्च 2023 रोजी चोंडी येथे आमदार प्रा.राम शिंदे यांची भेट घेतली. कृषि सहाय्यकांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा रखडलेला प्रश्न मार्गी लावल्याबद्दल राज्यसंघटनेच्या वतीने आमदार प्रा.राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेचे राज्याध्यक्ष संदिप केवटे, सचिव शिवानंद आडे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष सोमनाथ बाचकर, अहमदनगर कार्याध्यक्ष जयवंत गदादे, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ कुंढारे , अहमदनगर जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत तांदळे – कृषि पतसंस्थेचे संचालक प्रविण काजळे, विनोद नलावडे, प्रदीप गोसावी, रावसाहेब डमरे, तात्याराम गोपाळघरे, संतोष भागवत, श्रीराम चव्हाण ज्ञानदीप घोडे सह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेचे राज्याध्यक्ष संदिप केवटे म्हणाले की, कृषी सहायक ऐवजी सहाय्यक कृषि अधिकारी असे पदनाम करावे ही गेल्या 10 ते 12 वर्षांपासून आमच्या संघटनेची सरकारकडे मागणी होती. आमदार प्रा.राम शिंदे साहेबांनी हा विषय हातात घेतला. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आम्हाला न्याय मिळाला. म्हणून संघटनेच्या वतीने साहेबांचे आभार मानण्यासाठी आम्ही आज चोंडीला आलो होतो. कृषि सेवकांच्या मानधनवाढीचाही विषय सरकारकडे प्रलंबित आहे. तो विषय मार्गी लावावा असे साकडे यावेळी केवटे यांनी आमदार प्रा राम शिंदे यांना घातले.