जामखेड टाइम्स वृत्तसेवा : वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचा प्रस्ताव सदोष होता, तो दुरुस्त करून घेऊन मार्गी लावला. सरकारने त्याला मंजुरी दिली. न्यायालयाची इमारत सुध्दा मंजुर करून आणली, कर्जत तालुक्याचे वैभव वाढावे यासाठी प्रयत्न करणारा मी कार्यकर्ता आहे. सरकारने स्थगिती दिली हा धादांत खोटा आरोप आहे. तुमची सर्व कामे सरकारच्या माध्यमांतून मी मार्गी लावणारच आहे, असा शब्द आमदार प्रा राम शिंदे यांनी कर्जतमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना दिला.
कर्जत येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजुर व्हावे यासाठी आमदार राम शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले. शिंदे-फडणवीस सरकारने कर्जत न्यायालयाला मंजुरी दिल्यामुळे कर्जत वकिल संघाच्या वतीने आमदार प्रा राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात शिंदे बोलत होते.
यावेळी कर्जत वकिल संघटनेचे अध्यक्ष ॲड श्री महामुनी व उपाध्यक्ष ॲड संदिप धोदाड ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.बाळासाहेब शिंदे, बप्पाजी पिसाळ काका धांडे, अशोक खेडकर, बापु शेळके, पप्पूशेठ धोदाड, शेखर खरमरे, गणेश क्षीरसागर, धनंजय मोरे पाटील, शोएब काका काझी, प्रकाश काका शिंदे, संपतराव बावडकर, ज्ञानदेव लष्कर, पै बंडा मोढळे, शरद म्हेत्रे, गणेश पालवे, विलास काळे, अनिल गदादे, नीळकंठ शेळके, उदय परदेशी, राजेंद्र येवले , भाऊ गावडे यांच्यासह सर्व वकिल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार प्रा राम शिंदे यांची विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर कर्जत वकिल संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात शिंदे यांनी वकिल संघटनेला शब्द दिला होता. अखेर शिंदे यांनी तो शब्द खरा करून दाखवला. बुधवारी शिंदे-फडणवीस सरकारने कर्जत येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजुरीस मान्यता दिली.न्यायालय मंजुर होताच कर्जतमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.