जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जलजीवन मिशन योजनेच्या टेंडर प्रक्रियेमध्ये मनमानी कारभार करणाऱ्या अहमदनगर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंत्यास आमदार राम शिंदे यांनी चांगलाच दणका दिला आहे. आमदार राम शिंदे यांच्या तक्रारीनंतर संबंधीत मुजोर उपअभियंत्यांची तडकाफडकी बदली करण्याचे तसेच टेंडर प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले आहेत. या कारवाईमुळे अहमदनगर जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे.
जामखेड तालुक्यात मंजूर असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत होणाऱ्या टेंडर प्रक्रियेमध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता आनंद रुपनर यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. तश्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे करण्यात आल्या होत्या. तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रा राम शिंदे यांच्याकडेही याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत होणाऱ्या टेंडर प्रक्रियेत मनमानी कारभार होत असल्याचे लक्षात येताच आमदार राम शिंदे हे ऑक्शन मोडवर आले. त्यांनी सर्व माहिती जमा केली. त्यानंतर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची जामखेड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी भेट घेतली. या भेटीत शिंदे यांच्यासमवेत भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची आमदार राम शिंदे यांनी भेट घेऊन संबंधित मुजोर अधिकाऱ्याने केलेल्या कारभाराचा पाढा वाचला. तसेच त्या अधिकाऱ्याने जो मनमानी कारभार केलाय तो सर्व प्रकार त्यांच्या समोर मांडला.सदर अधिकाऱ्याच्या सर्व तक्रारी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी आनंद रुपनर या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.
त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी 22 ऑगस्ट 2022 रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अंगद रूपनर यांचा पदभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी पी. एस. जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रूपनर हे नेवासा येथे नियुक्तीस असणार आहेत. रूपनर यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
जलजीवन मिशन प्रक्रियेमध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करून ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच सदर योजनेतील झालेल्या चुकीची निविदा प्रक्रिया चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याची चर्चा आता मतदारसंघात रंगली आहे.
म्हणून मुजोर अधिकाऱ्याची बदली झाली – शरद कार्ले
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या उप अभियंत्याकडून जलजीवन मिशन योजनेच्या टेंडर प्रक्रियेत मनमानी कारभार करण्यात येत होता. तो प्रकार आम्ही आमचे नेते आमदार प्रा राम शिंदे साहेबांच्या लक्षात आणून दिला. शिंदे साहेबांनी याची तत्काळ दखल घेतली आणि मुजोर अधिकाऱ्याची बदली केली. – शरद कार्ले, तालुकाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, जामखेड