धनगर आरक्षण अंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदेंनी घेतला पुढाकार ! औरंगाबादेत होणार खलबते, सरकारच्या भूमिकेकडे लागले धनगर समाजाचे लक्ष !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : चोंडीत गेल्या दहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. दोघा उपोषणकर्त्यांची तब्येत सातत्याने खालावत आहे. याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. यापुढच्या काळात राज्यात तीव्र पडसाद उमटणार आहेत.धनगर समाजाच्या या प्रश्नाकडे लक्ष घातलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी तातडीनं राज्य सरकारचे लक्ष वेधणार आहे. शनिवारी राज्य मंत्रीमंडळाची छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे बैठक होणार आहे.तत्पूर्वी आज रात्री काही मंत्री येथे दाखल होतील. त्यांच्याशी धनगर समाजाची व्यथा आणि प्रश्न याबाबत मी चर्चा करणार आहे. लवकरात लवकर बैठक घेऊन याच्यावरती तोडगा काढावा यासाठी मी चर्चा करणार आहे, अशी माहिती आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली.

MLA Ram Shinde took  initiative to draw government's attention to Dhangar reservation movement, Dhangar community Attention has been paid to maharashtra government role

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र चोंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाचे अंदोलन हाती घेण्यात आले आहे. या उपोषणाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. ठिकठिकाणी अंदोलने होत आहे. राज्यभरातील धनगर बांधव चोंडीत दाखल होऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन अंदोलनास पाठिंबा देत आहेत. उपोषणाच्या अंदोलनास दहा दिवस उलटूनही महाराष्ट्र सरकारकडून या अंदोलनाची दखल न घेतल्यामुळे राज्यातील धनगर समाजाचा सरकारविरोधात रोष वाढत चालला आहे. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटणार असे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान आमदार प्रा.राम शिंदे यांनी आज, शुक्रवारी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचीत जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने श्रीक्षेत्र चोंडी  येथे गेली १० दिवसापासून चालु असलेल्या आमरण उपोषणाची दखल घेण्याबाबत आमदार प्रा राम शिंदे हे संभाजीनगर  येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार सह मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधणार आहेत. यासाठी आमदार प्रा.राम शिंदे हे आज तातडीने औरंगाबादला (संभाजीनगर) रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

चोंडीत गेल्या 10 दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी उपोषणाचे अंदोलन सुरू आहे. उपोषणकर्त्यांची जी मागणी आहे त्या मागणीच्या अनुषंगाने राज्य सरकारने बैठक घेऊन केंद्राला शिफारस करण्याची आवश्यकता आहे, पण अद्यापपर्यंत कुठलीही हालचाल झालेली नाही, महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील उपोषण स्थळी भेट देणार होते परंतू अचानक त्यांचा दौरा रद्द झाला. ते आले असते तर धनगर समाजाच्या मागण्यांवर चर्चा झाली असती पण त्यांचा दौरा रद्द झाला. परंतू उद्या, शनिवारी मंत्रीमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मी तातडीने औरंगाबादला ( छत्रपती संभाजीनगर) निघालो आहे, असे आमदार प्रा.राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

यावेळी पुढे बोलताना आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले की, सरकार कोणतंही असो, पक्ष कोणताही असो, धनगर समाज सातत्यानं संयमाची शांततेची भूमिका घेऊन लोकशाही पध्दतीनं उपोषण करणं असेल, अंदोलन करणं असेल ही भूमिका पार पाडत आलेला आहे. गेल्या दहा दिवसांपासून चोंडीत उपोषण सुरू आहे. आमच्या प्रश्नाकडे शासन आणि प्रशासन लक्ष देत नाही ही धनगर समाजाची भावना झाली आहे. परंतू असं न होता, राज्य सरकारने तातडीने लक्ष दिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून मी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार सह राज्यमंत्रीमंडळातील इतर मंत्र्यांची भेट घेणार आहे, आज रात्री चर्चा होईल आणि त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही होईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.