एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्रासाठी आमदार राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला, कुसडगाव ग्रामस्थ आमदार राम शिंदेंच्या दारी, शिंदे काय म्हणाले ? वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड तालुक्यातील कुसडगांव येथे मंजूर असलेले राज्य राखीव पोलिस बल गट (एसआरपीएफ) प्रशिक्षण केंद्र इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू होताच, हा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. कुसडगांव येथून सदरचे प्रशिक्षण केंद्र हलविण्यात येऊ नये, यासाठी कुसडगाव ग्रामस्थ एकवटले आहेत. कुसडगांवच्या ग्रामस्थांनी सोमवारी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रा राम शिंदे यांची चोंडी येथील निवासस्थानी भेट घेतली. एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र इतरत्र हलविण्यात येऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे कुसडगाव ग्रामस्थांनी शिंदे यांच्याकडे केली.
आमदार राम शिंदे हे फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना जामखेड तालुक्यातील कुसडगांव येथे महाराष्ट्र पोलिसांची फोर्स आणण्यासाठी 2017 – 2018 साली प्रयत्न सुरू केले होते. तसा ठराव कुसडगांव ग्रामपंचायतकडूून करण्यात आला होता. तसेच मंत्री शिंदे यांच्या काळातच 45 हेक्टर जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर सदर जागेवर एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र मंजुर झाले होते. सध्या या केंद्राचे काम वेगाने सुरू आहे. 30 टक्क्यापेक्षा अधिक काम पुर्ण झाले आहे.
दरम्यान सदरचे एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र पुन्हा भुसावळ तालुक्यातील वरणगावला हलविण्यात यावे यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत मागणी केली आहे. फडणवीस यांनी सावकारे यांच्या मागणीवर सकारात्मकता दाखवल्याने कुसडगांव एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राचा मुद्दा पुन्हा तापला आहे. जामखेड तालुक्यातून हा प्रकल्प जाणार का ? याबाबत तालुक्यातील जनतेत अस्वस्थता पसरली आहे.
आमदार संजय सावकारे यांची मागणी काय ?
भुसावळचे भाजपा आमदार संजय सावकारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, माझ्या मतदार संघातील वरणगाव ता. भुसावळ येथे आपण मुख्यमंत्री असतांना पोलीस प्रशिक्षण केंद्राऐवजी राज्य राखीव पोलिस दलाचे (SRPF) प्रशिक्षण केंद्र मंजूर केले होते. सदर प्रशिक्षण केंद्रासाठी आपण 100 कोटींचा निधी मंजूर करून पद निर्मिती देखील करण्यात आली होती. सदर प्रशिक्षण केंद्र व पद निर्मिती हे सर्व शासकीय परवानग्या घेऊन मान राज्यपाल यांच्या परवानगी तसे शासकीय परिपत्रक काढले होते.
परंतु सरकार बदल झाल्यानंतर केवळ एका सदस्याच्या पत्राने सदर प्रशिक्षण केंद्र येथून रद्द करून जामखेड तालुक्यातील कुसडगांव येथे हलविण्यात आले.माझ्या मतदार संघावर हा अन्याय आहे. आज पुन्हा आपले सरकार आहे आपणास विनंती आहे कि, आपण मंजूर केलेले SRPF प्रशिक्षण केंद्र पुन्हा वरणगाव ता. भुसावळ येथे मंजूर करावे, अशी विनंती करत आमदार सावकारे यांनी मागणी केली होती.
आमदार सावकारे यांच्या पत्रावर उपमुख्यमंत्र्यांनी काय म्हटलयं ?
आमदार संजय सावकारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रावर फडणवीस यांनी एक शेरा लिहिला आहे, त्यात म्हटले आहे की, प्रशिक्षण केंद्र वरणगाव येथेच मंजुर होते. ते अन्यत्र हलवले असल्यास तो निर्णय स्थगित करून पुनश्च वरणगाव येथेच केंद्र करण्यात यावे असे म्हटले आहे.
गृहविभागाने पत्रात काय म्हटले आहे ?
आमदार संजय सावकारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि. ०४.०७.२०२२ रोजी लिहिलेल्या पत्रानंतर गृहविभागाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राचा विषय राज्य राखीव पोलिस दल जामखेड ता कर्जत जि अहमदनगर येथून वरणगाव ता भुसावळ जि जळगांव येथे स्थापित करण्यात असा लिहिण्यात आला आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की, आमदार संजय सावकारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातील नमूद मुद्द्यांच्या अनुषंगाने आपले सुस्पष्ट अभिप्राय शासनास सादर करावे असे म्हटले आहे.
तसेच शासनाने गृह विभाग, शासन निर्णय दि. २६/६/२०२० व्दारे राज्य राखीव पोलीस दल .१९ कुसडगांव, जि. अहमदनगर येथे स्थापन करण्यास दिलेल्या मान्यतेनुसार त्याठिकाणी सद्यस्थितीत चालू असलेले बांधकाम निधी वितरण व इतर बाबींची माहिती शासनास सादर करावी, असे म्हटले आहे.
आमदार राम शिंदेंच्या चाणाक्षपणामुळे जामखेड तालुक्यात आले होते शासकीय कृषी महाविद्यालय
एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र वरणगावला की कुसडगांवला हा जसा वाद पेटला आहे तसाच वाद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय जामखेड तालुक्यातील हळगाव येथे उभारताना जामखेड विरूध्द श्रीगोंदा असा वाद फडणवीस सरकार काळात पेटला होता. हा वाद हायकोर्टात गेला होता. तसेच तीन कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या समितीचा अहवालही विरोधात गेला होता. मात्र मंत्रीपरिषदेने हळगावच्या शासकीय कृषी महाविद्यालयाला परवानगी देऊन वाद मिटवला होता.
तत्कालिन मंत्री राम शिंदे यांनी हळगाव कृषी महाविद्यालय उभारताना आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेऊन ठेवल्या होत्या. त्यामुळे जामखेड तालुक्यातील हळगाव येथे शासकीय कृषी महाविद्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता कुसडगांव एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्रांसाठी आमदार राम शिंदे हे पुन्हा एकदा मैदानात उतरून जामखेड तालुक्यातील जनतेला मोठे गिफ्ट देणार का ? याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
SRPF साठी आमदार रोहित पवारांनी सर्व प्रशासकीय परवानग्या मिळवल्या होत्या का ?
जामखेड तालुक्यातील कुसडगांवमधील एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र वरणगावला हलविण्याच्या हालचाली सुरू आहे. शासनाने याची सर्व माहिती मागवली आहे. कुसडगावला एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र आणताना सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता झाली होती का ? हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे, परंतू कुसडगावला एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र आणताना आमदार रोहित पवार यांनी सर्व प्रशासकीय परवानग्या मिळवल्या होत्या का ? हा सवाल आता उपस्थित झाला आहे. पवारांनी कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता कुसडगावला एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र पळवले असा अर्थ आमदार संजय सावकारे यांच्या पत्रातून अधोरेखित होत असल्याने जामखेड तालुक्यातून मोठा प्रकल्प जाणार की काय ? याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
जामखेड तालुक्यात पसरली अस्वस्थता
जामखेड तालुक्यात कुसडगांव येथील एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र वरणगावला हलविण्याच्या हालचाली सुरु झाल्याने जामखेड तालुक्यात अस्वस्थता पसरली आहे. कुसडगांव येथून महत्वाचा प्रकल्प बाहेरच्या जिल्ह्यात जाऊ नये अशी तालुक्याची जनभावना आहे.
एसआरपीएफ केंद्रासाठी कुसडगाव ग्रामस्थ एकवटले
कुसडगाव येथील एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्रांचे काम वेगाने सुरू आहे. हे केंद्र इतरत्र हलविण्यात येऊ नये, अशी कुसडगांव ग्रामस्थांची मागणी आहे. कुसडगाव ग्रामस्थांनी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार राम शिंदे यांची भेट घेऊन सदरचे केंद्र इतरत्र हलवू नये, शासन दरबारी पाठपुरावा करून जामखेड तालुक्यातच हा प्रकल्प रहावा अशी गळ घातली आहे.
सदर SRPF केंद्र हे कुसडगांव मध्ये झाल्यास गावातील शेतकऱ्यांना तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याच्या संधी आहेत. फळे, पालेभाज्या, दूध तसेच इतर लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू याची मागणी या ठिकाणी होणार आहे. या बाबींची पुरवठा करण्यासाठी जवळील ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. हीच मागणी घेऊन ग्रामस्थांनी शिंदे यांना निवेदन दिले.
यावेळी कुसडगांवचे सरपंच शहाजी गाडे, उपसरपंच नागेश कात्रजकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संजय बापू कार्ले, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, ग्रामपंचायत सदस्य पै. पप्पू कात्रजकर, युवराज गंभीरे, मधुकर खरात, वि.वि.सोसायटीचे चेअरमन केशव कात्रजकर, माजी सरपंच भानुदास टिळेकर, अशोक गंभीरे, विठ्ठल कात्रजकर,प्रशांत कात्रजकर शैलेश कुलकर्णी, बाळासाहेब काकडे, रामभाऊ टिळेकर, गणेश गंभीरे, उमेश काकडे, सूरज राऊत, चंदू कार्ले, सागर काकडे, भरत कात्रजकर, अशोक कात्रजकर, विष्णू गंभीरे, धनंजय राऊत, बाळासाहेब कार्ले यांनी आमदार राम शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
आमदार राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
कुसडगावला मंजुर झालेले एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र वरणगावला हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. याचा अहवाल काय येतो ? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. परंतू जामखेड तालुक्यात (कुसडगांव) येथे पोलिस फोर्सचे युनिट व्हावे ही सुरूवातीपासूनची आमदार राम शिंदे यांची इच्छा होती. यासाठी आमदार राम शिंदे यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. सदरचा प्रकल्प जामखेड तालुक्यात कायम ठेवण्यात शिंदे यशस्वी होतील अशी तालुक्यातील जनतेची भावना आहे.
आमदार राम शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू गोटातील नेते म्हणून राज्याच्या राजकारणात ओळखले जातात. फडणवीस यांच्याकडे शिंदे यांच्या शब्दांला मोठी किंमत आहे. आमदार राम शिंदे हे आपल्या राजकीय वजनाचा वापर करण्यात यशस्वी झाल्यास कुसडगाव एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राचा मुद्दा गेम चेंजर ठरणार आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील जनतेचे लक्ष आमदार राम शिंदे यांच्या भूमिकेकडे एकवटले आहे.
काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी !
कुसडगाव एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र कुसडगांव मध्येच रहावे या मागणीसाठी कुसडगाव ग्रामस्थांनी आमदार राम शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी ग्रामस्थांचा भावना जाणून घेतल्या. आपली मागणी शासन दरबारी पोहचवली जाईल. तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. काळजी करू नका, असा शब्द आमदार राम शिंदे यांनी कुसडगाव ग्रामस्थांना दिला.