कर्जत – जामखेड मतदारसंघातील तीर्थक्षेत्र विकास कामांची स्थगिती उठवावी यासाठी रोहित पवारांचे मंत्र्यांना साकडे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकार हाती घेतलेल्या विकास कामांना ब्रेक लावला आहे. याचा फटका कर्जत जामखेड मतदारसंघालाही बसला आहे. मतदारसंघातील तीर्थक्षेत्रांच्या विकास कामांना शिंदे सरकारने दिले स्थगिती उठवावी यासाठी आमदार रोहित पवारांनी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांना साकडे घातले आहे.
आमदार रोहित पवार यांनी मुंबई दौऱ्यात मतदारसंघातील विविध प्रश्नांवर विविध खात्यांच्या मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यां मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेतली. बालसंगोपन योजनेतील लाभार्थ्याचे थकीत अनुदान मिळावे तसेच पर्यटन विभागाशी संबंधित मंजुरी मिळालेल्या कामांवर सरकारने आणलेली स्थगिती उठवावी याबाबत त्यांनी लोढा यांच्याशी चर्चा केली.
बालसंगोपन योजनेंतर्गत पालकांचे छत्र हरवलेल्या आणि संरक्षणाची गरज असलेल्या 18 वर्षांखालील निराधार मुलांना शासनाच्या वतीने आर्थिक सहाय्य केले जाते व त्यांची काळजी घेतली जाते. जामखेड तालुक्यातील 658 तर कर्जत तालुक्यातील 766 पात्र लाभार्थ्यांना योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना त्याचे अनुदान अजूनही मिळालेले नाही. त्याबाबत आमदार रोहित पवार यांनी महिला व बालविकास मंत्र्यांकडे लाभार्थ्यांना तातडीने अनुदान वाटप करण्यात यावे अशी मागणी केली.
तसेच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म गावी चौंडी येथे स्वागत कमान, संग्रहालय बांधकाम, बारव व नदी काठावरील घाटाचे काम तसेच खर्डा येथील संत भगवान बाबांचे गुरु श्री संत गीते बाबा यांच्या समाधी स्थळांच्या सुशोभीकरणाचे काम व संत सिताराम बाबा यांचे समाधीस्थळाचे सुशोभीकरण तसेच राशीन येथील प्रसिद्ध व भक्तांचे श्रद्धास्थान असलेले जगदंबा देवस्थान सुशोभीकरण व मांदळी येथील लालागिर स्वामी मंदिर येथील सभामंडप स्वयंपाक खोली बांधकाम इत्यादी कोट्यवधींच्या कामांना सरकारने लावलेली स्थगिती उठवावी अशी विनंती रोहित पवार यांनी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे.
तसेच वनविभागाच्या परवानगी अभावी मतदारसंघात रस्त्यांची काही कामे प्रलंबित आहेत, त्याबाबत लक्ष घालावं अशी विनंती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून आमदार रोहित पवार यांनी केली.