ब्रेकिंग : जामखेडमध्ये विद्यार्थ्यांच्या अंदोलनाला मिळाले मोठे यश, अखेर डाॅ भास्कर मोरेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी डाॅ भास्कर मोरे यांच्या विरोधात हाती घेतलेल्या आक्रमक अंदोलनास तिसऱ्या दिवशी रात्री उशिरा मोठे यश आले. डाॅ भास्कर मोरेंविरोधात (Dr Bhaskar More Jamkhed) जामखेड पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका विद्यार्थिनीने फिर्याद दाखल केली आहे. रत्नदीप मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थीनींकडून डाॅ मोरे यांच्याविरोधात अश्या प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची ही दुसरी वेळ आहे.
जामखेडच्या रत्नापुर येथील रत्नदीप मेडिकल काॅलेजमध्ये राज्यभरातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या काॅलेजचे संस्थापक डाॅ भास्कर मोरे यांच्या मनमानी कारभाराविरोधात मंगळवारी विद्यार्थ्यांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली होती. रत्नदीप संस्थेतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी भव्य मोर्चा काढला होता.यावेळी विद्यार्थ्यांनी डाॅ भास्कर मोरे यांच्या मनमानी कारभाराचा बुरखा प्रशासनासमोर टराटरा फाडला होता.मोरे यांच्याकडून विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची आर्थिक, मानसिक व शारीरिक पिळवणूक होत असल्याचे गंभीर आरोप यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते.
जोवर डाॅ भास्कर मोरेंवर गुन्हा दाखल होत नाही तोवर अंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून रत्नदीपच्या विद्यार्थ्यांचे जामखेडमध्ये आक्रमक अंदोलन सुरु होते. या अंदोलनाला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे डाॅ भास्कर मोरेंवर कारवाईसाठी प्रशासनावर दबाव वाढला होता. अखेर डाॅ मोरेंविरोधात 7 मार्च 2024 रोजी रात्री उशिरा जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका पीडित विद्यार्थीनीने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार डाॅ भास्कर मोरे यांच्याविरूध्द IPC- 354,354(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की,20 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक भास्कर मोरे पाटील यांनी फिर्यादी तरूणीस कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले होते. या ऑफिसमधील अँटी चेंबर मध्ये फिर्यादी तरूणीला घेऊन जात तिच्याशी अश्लिल चाळे केले होते. स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते. त्यानुसार पीडित तरूणीच्या फिर्यादीवरून भास्कर मोरे विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुर्वी भास्कर मोरे विरोधात अश्याच स्वरूपाचा गुन्हा जामखेड पोलिस स्टेशनला दाखल आहे. या प्रकरणात मोरे हे अटकपूर्व जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करत आहेत.
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलात आयुर्वेद, होमिओपॅथी, फार्मसी आणि नर्सिंग महाविद्यालय चालवले जाते. या विद्यालयांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी मंगळवारी संस्थाचालक भास्कर मोरेंविरोधात भव्य मोर्चा काढला होता. पोलिस स्टेशन समोर सहा तास ठिय्या दिला होता. दुसऱ्या दिवशीही आक्रमक अंदोलन केले होते.
तिसऱ्या दिवशी या अंदोलनाची तीव्रता आणखीन वाढली होती. विद्यार्थ्यांनी खर्डा चौकातून तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला होता. रत्नदिपच्या विद्यार्थ्यांच्या अंदोलनास विविध सामाजिक – राजकीय संघटनांचा पाठिंबा वाढला होता. गेल्या तीन दिवसांपासून जामखेड शहर डाॅ भास्कर मोरे यांच्याविरोधातील घोषणांनी दणाणून गेले होते. या अंदोलनात झळकावण्यात आलेले फलक डाॅ भास्कर मोरे यांची आब्रु वेशीवर टांगणारे ठरले.तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या अंदोलनाची जनमाणसांत जोरदार चर्चा रंगली होती.
दरम्यान, गुरुवारी प्रांताधिकारी नितिन पाटील व पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी जामखेडला भेट दिली. जामखेडमध्ये विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या अंदोलनाची त्यांनी दखल घेतली. रत्नदीपच्या विद्यार्थीनींनी केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी महिला पोलिस अधिकाऱ्याची (सहाय्यक पोलीस निरीक्षक) नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती त्यांनी अंदोलक विद्यार्थ्यांना दिली. मात्र जोवर डाॅ भास्कर मोरेंवर गुन्हा दाखल होत नाही तोवर मागे हटणार नाही, असा निर्धार अंदोलक विद्यार्थ्यांनी केला होता.
रत्नदीपच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतलेले अंदोलन अधिक तीव्र बनल्याने अखेर गुरुवारी रात्री उशिरा एका पीडित विद्यार्थीनीच्या फिर्यादीवरून डाॅ भास्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या अंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून अंदोलन करत असलेल्या रत्नदीपच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी उपोषण सुरु केले होते. उपोषणाच्या पहिल्या दिवशी काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना जामखेड ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनेक मुला मुलींना अशक्तपणा आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून तहान भूक विसरून विद्यार्थी आक्रमकपणे डाॅ मोरेंविरोधात अंदोलन करताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे रत्नदिपमधील कृष्णकृत्याचा भांडाफोड झाला आहे.
जामखेड तालुका वकिल संघाचा विद्यार्थ्यांच्या अंदोलनास पाठिंबा
रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या उपोषणाच्या अंदोलनास जामखेड तालुका वकिल संघाने पाठिंबा दिला आहे. रत्नदीप मेडिकल कॉलेजमधील मुली सुरक्षित नसल्याचे सध्या सुरू असलेल्या अंदोलनावरून स्पष्ट होत असून रत्नदीप मेडिकल कॉलेजमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराची तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांनी तातडीने राज्य महिला आयोगाकडे तक्रार करावी. सदर प्रकरणाची महिला आयोगाकडून सखोल चौकशी करावी, अशी मागणी जामखेड तालुका वकिल संघाने केली. रत्नदीप मधील विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या अंदोलनास संभाजी ब्रिगेड, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मनसे, प्रहार, आरपीआय सह आदी सामाजिक राजकीय संघटनांनी सक्रीय पाठिंबा दिला आहे.