MPSC Exam Results | चापडगावच्या ऐश्वर्या शिंदेने केली कमाल : मंगळवारी नायब तहसीलदार तर बुधवारी सहाय्यक वन संरक्षक अधिकारी म्हणून निवड !

एकाच वेळी पास झाली MPSC च्या  दोन परीक्षा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । MPSC Exam Results | स्पर्धा परीक्षा म्हटलं की, नजरेसमोर येतो तो कठीण अभ्यास; प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी इच्छूक असलेले त्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतात, पण यश प्रत्येकालाच मिळेल असं काही नसतं. जो अभ्यासाच्या कसोटीवर टिकतो तोच यशाला गवसणी घालतो हे जरी सत्य असले तरी, नशिबातसुध्दा यश असावं लागतं. नशिब फळफळणे म्हणजे काय याचा अनुभव मोजक्याच लोकांच्या आयुष्यात येत असतो. असाच अनुभव कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील ऐश्वर्या शिंदे ही तरूणी घेत आहे.

2019 साली घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल (MPSC Result) मंगळवारी जाहीर झाला होता. त्यात कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील ऐश्वर्या बाळासाहेब शिंदे हिची नायब तहसीलदार म्हणून निवड झाली होती. (Aishwarya Shinde of Chapadgaon became the Deputy Tehsildar)

तर बुधवारी राज्य लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला. या निकालातही ऐश्वर्या शिंदे हिने मोठे यश संपादन केले आहे.महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेच्या निकालानुसार ऐश्वर्या शिंदे हिची सहाय्यक वन संरक्षक ( गट अ ) (Assistant Conservative of Forest) या पदासाठी निवड झाली आहे.ऐश्वर्या शिंदे हिने दुहेरी यश संपादन केल्याने शिंदे कुटूंब व समस्त चापडगावकर आनंदून गेले आहेत.

नायब तहसीलदार व सहायक वन संरक्षक म्हणून निवड झालेली ऐश्वर्या शिंदे ही कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील रहिवासी आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अधिकारी चापडगावमध्ये खूप आहेत. परंतु पहिल्यांदाच चापडगावमधून महिला अधिकारी होण्याचा मान ऐश्वर्याने पटकावला आहे.ऐश्वर्याने राहुरी कृषी विद्यापीठातून BSC ॲग्री पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तिथेच तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. ऐश्वर्याचे वडील ॲड बाळासाहेब दत्तात्रय शिंदे हे कर्जत न्यायालयात वकिली व्यवसाय करतात.चापडगावमधील पहिली महिला अधिकारी होण्याचा मान ऐश्वर्या शिंदे हिने पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

मुलींना संधी मिळाल्यास, त्या संधीचं सोनं करतात हे ऐश्वर्याने दाखवून दिले आहे. ऐश्वर्याच्या निवडीमुळे चापडगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रत्येक चापडगावकरासाठी ही अभिमानाची बाब आहे.येणाऱ्या काळात ऐश्वर्याचा आदर्श चापडगाव आणि परिसरातील मुली नक्की घेतील यात तिळमात्र शंका नाही अशी भावना वृक्षवल्ली ग्रुपचे संस्थापक ॲड. विकास शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

 

web titel : MPSC Exam Results Aishwarya Shinde of Chapadgaon became the Deputy Tehsildar Assistant Conservative of Forest