नागपुर हिवाळी अधिवेशन: आमदार प्रा राम शिंदे यांच्या पुढाकारातून उद्योगमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक, कर्जत एमआयडीसी बाबत नागपूरात आज होणार बैठक
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत एमआयडीसी बाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 3 वाजता नागपूर येथील विधानभवनात महत्वपूर्ण बैठक होणार आहे, अशी माहिती राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली.
कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या हाती रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी दोन्ही तालुक्यात एमआयडीसी व्हाव्यात यासाठी आमदार प्रा.राम शिंदे हे प्रयत्नशील आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कर्जत एमआयडीसीचा मुद्दा राज्यात वेगवेगळ्या कारणांनी गाजत आहेत. परंतू कर्जत तालुक्यात एमआयडीसी व्हावी यासाठी आमदार शिंदे हे 2015-16 पासून प्रयत्नशील आहेत. महायुती सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून कर्जत एमआयडीसी मंजूर व्हावी यासाठी आमदार शिंदे यांनी कंबर कसली आहे. मागील अधिवेशनात कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर त्यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम 97 अन्वये विधानपरिषदेत चर्चा घडवून आणण्यात आली होती.
राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या उपराजधानी नागपूर शहरात सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसर्या आठवड्यात कर्जतकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मंगळवार दिनांक 12 रोजी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नागपूर येथील विधानभवनातील दालनात ( दालन क्रमांक 105) दुपारी 3 वाजता कर्जत एमआयडीसी बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीस उद्योग विभागाचे प्रधान सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी म.औ.वि.म, मुंबई, अहमदनगर जिल्हाधिकारी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी म.औ.वि.म, मुंबई, सह सचिव उद्योग विभाग, उप मुख्य कार्यकारी अधिकारी म.औ.वि.म, मुंबई, महाव्यवस्थापक (भूमी) म.औ.वि.म, मुंबई, प्रादेशिक अधिकारी म.औ.वि.म, नाशिक, प्रांताधिकारी कर्जत व इतर संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. सदर बैठकीबाबत उद्योग विभागाकडून पत्र जारी करण्यात आले आहे.
कर्जत एमआयडीसी बाबत मंगळवारी 12 रोजी महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे कर्जत तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.