शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी : जामखेड तालुक्यात लम्पी आजाराची एन्ट्री, पशुपालकांमध्ये उडाली खळबळ, पशुपालकांनी काय काळजी घ्यावी ? जाणून घ्या सविस्तर !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। राज्यातील अनेक जिल्ह्यात लम्पी स्कीन (lumpy skin disease) आजाराने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही हा आजार फैलावताना दिसत आहे. या आजाराने जामखेड तालुक्यात धडक दिली आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील पशुपालकांच्या चिंता वाढल्या आहेत. लम्पी स्कीन आजारामुळे अहमदनगर जिल्ह्यात अत्तापर्यंत 116 जनावरांना लागण झाली आहे. तर तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे.
जामखेड तालुक्यातील मोहरी येथील एका शेतकऱ्याच्या तीन जनावरांचे सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यात एका जनावराचा लम्पी स्कीन आजाराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ संजय राठोड यांनी दिली.
जामखेड तालुक्यातील मोहरी, गवळवाडी, लोणी आणि जवळा आदी गावात या लम्पी आजाराने ग्रस्त जनावरे आहेत. या गावातील संशयित जनावरांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवले असून त्यापैकी मोहरी येथील नमुना पोजिटीव्ह आला आहे. अशा जनावरांना विविध औषधापचार दिले जात आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सहा. गविअ दयानंद पवार व पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय राठोड यांनी दिली.
लम्पी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य चर्मरोग असून हा साथीचा आजार गोवर्गीय व म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये आढळून येत आहे. गोवर्गात तीस टक्के, म्हैसमध्ये १.६ टक्के तुलनेत अधिक प्रमाणात आढळून येतो. सर्वसामान्यपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरात या आजाराची तीव्रता अधिक असते. या आजारात मृत्यू दर १-५% पर्यंत आढळून येतो. दुग्धउत्पादन मोठया प्रमाणावर घटते तसेच काही वेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते.
लम्पी स्कीन आजार कोणाला होतो ?
लम्पी स्कीन रोग हा विषाणूजन्य त्वचा रोग आहे. हा रोग गोवंशीय जनावरे तसेच म्हैसवर्गीय जनावरांना होणारा रोग आहे. किटकांपासुन हा रोग जनावरांमध्ये पसरतो. जनावरांपासून मानवाला हा आजार संक्रमित करत नाही. लम्पी स्कीन हा आजार जनावरांमध्ये वेगाने पसरणारा आजार आहे.
काय आहेत लम्पी स्कीन आजाराची लक्षणे ?
- लम्पी स्कीन आजाराचा संसर्ग झाल्यास जनावरांच्या नाकातून आणि डोळ्यातून पाणी येते.
- जनावरांच्या लसिकाग्रंथींना सुज येते.
- जनावरांना सुरूवातीस ताप येतो.
- दुभत्या जनावरांचे दुधाचे प्रमाण कमी होते.
- चारा खाणे, पाणी पिणे याचे प्रमाण कमी होते.
- बाधित जनावरांच्या त्वचेवर हळूहळू १०-५० मि.मी. व्यासाच्या गाठी येतात.
- तोंडातील व्रणामुळे जनावरे चारा कमी खातात.
- डोळ्यातील व्रणांमुळे चिपडे येतात तसेच जनावरांची दृष्टी होते.
- जनावरांचे पाय सुजतात, जनावरे लंगडतात.
असा होतो प्रसार
या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या (स्टोमोक्सीस), डास (अडीस), गोचीड, चिलटे (कुलीकॉईडीस) यांच्या मार्फत होतो. तसेच या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो. विषाणू संक्रमण झाल्यानंतर ते १- २ आठवड्यापर्यंत रक्तामध्ये राहतात. त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतात. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळयातील पाणी व तोंडातील लाळेतुन विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दुषित होतो. त्यातून इतर जनावरांना या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ (३५ दिवस) जिवंत राहू शकतात. विर्यात विषाणू येत असल्याने रोगाचा फैलाव कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून होऊ शकतो. गाभण जनावरांत या आजाराची लागण झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो.
पशुपालकांनी काय काळजी घ्यावी ?
- बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
- निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
- गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
- जनावरामध्ये हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
- बाधित गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
- गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
- बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
- लम्पी स्कीन आजाराने जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
- रोगाचा प्रसार बाह्यकीटकांद्वारे (डास, माश्या, गोचीड आदी) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठ्यात बाह्यकीटकांच्या निर्मुलनासाठी औषधांची प्रमाणात फवारणी करावी.
लम्पी स्कीन आजाराचा फैलाव रोखण्यासाठी काय करावे ?
लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तसेच रोगनियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. बाधित व निरोगी जनावरे एकत्रित चारावयास सोडू नयेत. लम्पी आजार झालेल्या जनावरांना वेगळे करावे, बाधित गावांमध्ये व बाधीत गावांपासून ५ किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील ४ महिने वयावरील गाय व म्हैस वर्गातील जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे. बाधित जनावरांना औषधोपचार करून घ्यावे. रोगप्रादुर्भाव झाल्यास जनावरांची खरेदी-विक्री थांबवावी.
लम्पी स्कीन रोग प्रादुर्भावाची शक्यता आढळून आल्यास काय करावे ?
लम्पी स्कीन रोग औषधोपचाराने बरा होत आहे, त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. पशुसंवर्धन विभागाकडून तालुक्यात लसीकरण सुरू आहे. तसेच गावागावात जनजागृती केली जात आहे. पशुपालकांनी आपल्या जनावरांचे तातडीने लसीकरण करून घ्यावे. लम्पी स्कीन रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता आढळून आल्यास पशुपालकांनी तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा जामखेड पंचायत समितीशी संपर्क साधावा असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.