जामखेड टाइम्स वृत्तसेवा : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांचा कर्जत मुस्लिम समाजाच्यावतीने कर्जत शहर बंद ठेवत निषेध करण्यात आला. (Nupur Sharma and Naveen Jindal were strongly protested by the Muslim community in Karjat, Large response to Karjat bandh)
मोहम्मद पैगंबर यांच्यावर नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी वादग्रस्त विधान केले होते. याबाबत भारतात मुस्लिम समाजाच्यावतीने सर्वत्र निषेध नोंदविला गेला. याच अनुषंगाने शुक्रवार, दि १० रोजी कर्जत बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी सर्व व्यावसायिक बंधूनी सकाळपासूनच आपले सर्व व्यवहार बंद ठेवत कर्जत बंदला सकारात्मक प्रतिसाद दिला.
जुम्माची नमाज अदा केल्यानंतर कर्जत शहर आणि ग्रामीण भागातील सर्व मुस्लिम बांधवांनी शांततेत मूकमोर्चा काढत तहसील कार्यालयात आपल्या तीव्र भावना प्रशासनासमोर व्यक्त केल्या. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानाचा कडक शब्दात निषेध करीत भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने या दोघांवर कडक कारवाई करावी यासह त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी अशी एकमुखी मागणी केली.
यावेळी मौलाना युसूफ, मौलाना आखलाक, मौलाना शाहनवाज, मौलाना अब्दुल रहीम, मौलाना तय्यब, काँग्रेसचे सचिन घुले, कदीर सय्यद, मुबारक मोगल, जब्बार सय्यद, दुरगावचे उपसरपंच पप्पूभाई शेख, मिरजगावचे जमशेद शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केेले.
शेवटी सर्व मशिदीच्या धर्मगुरूंनी सकल मुस्लिम समाज कर्जत यांच्यावतीने तालुका प्रशासनास निवेदन दिले. सदर निवेदन निवासी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सालगुडे यांनी स्वीकारले.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त विधान करणारे नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी कर्जत बंदची हाक मुस्लिम समाजाच्यावतीने देण्यात आली होती. यास कर्जत शहर आणि तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या व्यापारी बांधवानी सकारात्मक प्रतिसाद देत आपले व्यवहार बंद ठेवले होते. त्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद मुस्लिम समाजाने यावेळी मानले.