मोठी बातमी : धनगर आरक्षणप्रश्नी चोंडीत सुरू असलेले उपोषण सुटले, आमदार प्रा.राम शिंदे यांनी घडवून आणलेला यशस्वी संवाद अन् ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला आले मोठे यश !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सरकार आणि यशवंत सेनेचे अंदोलक यांच्यात आमदार प्रा राम शिंदे यांनी घडवून आणलेल्या यशस्वी संवादामुळे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे जामखेड तालुक्यातील चोंडी येथे धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी सुरु असलेले आमरण उपोषणाचे अंदोलन 21 व्या दिवशी मागे घेण्यात आले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी चोंडीतील अंदोलनस्थळी आज दुसऱ्यांदा भेट दिली. तब्बल 3 तास अंदोलकांशी चर्चा करत त्यांनी तोडगा काढला. यावेळी सरकारच्या वतीने उपोषणकर्त्यांना लेखी पत्र देण्यात आल्यानंतर चोंडीत सुरु असलेले उपोषण मागे घेण्यात आले या निमित्ताने मंत्री गिरीश महाजन हे पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून सरकारच्या मदतीला धावून आले.
धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी या जन्मगावी 6 सप्टेंबर 2023 पासून आमरण उपोषणाचे अंदोलन हाती घेण्यात आले होते. यशवंत सेनेच्या वतीने बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांडगे, आण्णासाहेब रुपनर, सुरेश बंडगर, नितीन धायगुडे, समाधान पाटील, अक्षय शिंदे सह आदी हे उपोषणाला बसले होते. चोंडी येथील उपोषणकर्ते सुरेश बंडगर व आण्णासाहेब रूपनवर यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. सदर अंदोलनाची सरकारने तातडीने दखल घ्यावी व योग्य तोडगा काढावा यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी सरकारचे लक्ष वेधले होते.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे सरकारने चोंडीत सुरु असलेल्या अंदोलनाची गंभीर दखल घेतली होती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी चोंडीत येऊन अंदोलकांशी संवाद साधला होता. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली होती. या बैठकीत तोडगा निघाला नव्हता परंतू धनगर आरक्षण प्रश्नी सकारात्मक चर्चा झाली होती.
सरकारच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज 26 रोजी चोंडीतील अंदोलनस्थळी दुसऱ्यांदा संवाद साधला. यावेळी तब्बल 3 तास चर्चा झाली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी दूरध्वनीवरून अंदोलकांशी चर्चा घडवून आणली. चोंडीतील अंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत, त्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर सरकारच्या वतीने लेखी पत्र देण्यात आले. त्यानंतर उपोषण सोडण्यावर अंदोलकांनी सहमती दर्शवली.
यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार प्रकाश शेंडगे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, डाॅ स्नेहा सोनकाटे, सह धनगर समाजाकडून अनेक नेते तसेच शेकडो धनगर समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
खालील मुद्द्यांवर उपोषण मागे घेण्यात आले
1) धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत आयोजित बैठकीत सर्वांनी एकमताने राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दिला.
2) धनगर आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेल्या नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.
3) आवश्यकता भासल्यास,धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत” अभ्यास करण्यासाठी मा. उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा तसेच, सदर समितीमध्ये धनगर समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
4) आरक्षणाबाबत वरील कार्यवाही ५० दिवसात पुर्ण करण्याबाबत ठरविण्यात आले आहे.
5) तसेच, धनगर समाजाला लागू करण्यात आलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.