Lahu Borate Video : निरोपाच्यावेळी शिक्षकावर फुलांचा वर्षाव..बाया-बापडे, चिमुकले विद्यार्थी अन् अख्खं गाव हमसून हमसून रडले, पहा निरोपाचा भावनिक व्हिडीओ !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। डिजीटल युगात मानवी नातेसंबंधात पुर्वीसारखा जिव्हाळा राहिलेला नाही, अशी नेहमी चर्चा होते. पण आपल्या आसपास अश्या काही दुर्मिळ घटना घडतात, ज्या मानवी नातेसंबंधांचा जिवंतपणा अधोरेखित करतात. अशीच एक घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातून समोर आली आहे. पाथर्डी तालुक्यातील हनुमाननगर शाळेतील शिक्षक लहू बोराटे यांची 12 वर्षानंतर बदली झाली. निरोप देतेवेळी बाया बापडे, चिमुकले अन् अख्खं गाव हमसून हमसून रडत असल्याचा भावनिक व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल झाला आहे. (Lahu Borate)
शिक्षक लहू विक्रम बोराटे (Lahu Vikram Borate) यांची बदली झाली आहे. ते पाथर्डी तालुक्यातील हनुमाननगर (भारजवाडी) येथील प्राथमिक शाळेत गेल्या 12 वर्षांपासून कार्यरत होती. आता त्यांची बदली जामखेड तालुक्यात झाली आहे. त्यांना शाळा व गावकऱ्यांच्या वतीने नुकताच निरोप देण्यात आला. निरोप समारंभाला अख्खा गाव उपस्थित होता. यावेळी शिक्षक लहू बोराटे यांना निरोप देतेवेळी गावातील बाया बापडे, शाळेतले चिमुकले, शिक्षक आणि अख्खं गाव हमसून हमसून रडतं होतं, लहू बोराटे हेही चिमुकल्या विद्यार्थ्यांना बिलगुन रडत असल्याचा भावनिक व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल झाला आहे.
पाथर्डी तालुक्यातील हनुमाननगर भारजवाडी हा परिसर तसा उसतोड कामगारांचा परिसर आहे. ऊसतोड कामगारांची लेकरं या शाळेत शिक्षणासाठी असतात. लहू बोराटे यांनी 2011 साली हनुमाननगर शाळेत रूजू झाले होते, तेव्हा शाळेची पटसंख्या 20 होती, बारा वर्षे त्यांनी या शाळेला सेवा दिली. 2023 साली शाळेचा निरोप घेत असताना या शाळेची विद्यार्थी पटसंख्या 54 इतकी आहे. बारा वर्षाच्या कार्यकाळात बोराटे यांनी विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी पंचक्रोशीत ओळख निर्माण केली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी नेहमी नाविण्यपूर्ण उपक्रम ते राबवले. शाळाचा कायापालट केला. शाळेचा राज्यात नावलौकिक वाढवला. अनेक बक्षिसे पटकावली.
दरम्यान, शिक्षक लहू बोराटे यांची जामखेड तालुक्यात बदली झाल्यामुळे हनुमाननगर शाळेत निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांपासून, शिक्षक, गावकरी, जो तो आपल्या भाषणातून बोराटे गुरूजींच्या कार्याचा गौरव करत होता, सगळ्यांच्याच भावनांचा बांध फुटला होता. आश्रूंच्या महापुरात चिंब भिजलेले बोराटे गुरूजींच्याही आश्रूंचा बांध फुटला होता. यातून गावकऱ्यांचे आपल्या शिक्षकावर असलेलं प्रेम ओसांडून वाहत होतं, अख्खं गाव भावनिक झालं होतं, प्रत्येकाच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते. बोराटे गुरूजी चिमुकल्या लेकरांना बिलगून हमसून हमसून रडत असल्याचा व्हिडीओ पाहून आपसूकच कोणत्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या शिवाय राहणार नाहीत.
शिक्षक लहू बोराटे यांना निरोप देताना गावकऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. यावेळी सर्वांच्याच डोळ्यातून आसवांच्या धारा वाहत होत्या. आजपर्यंत अशा प्रकारचा निरोप कोणत्याही शिक्षक आला भेटला नसले, ते भाग्य बोराटे गुरुजींना मिळालं, बारा वर्षांत त्यांनी इमानदारीने केलेल्या शैक्षणिक सेवेची तपश्चर्या खऱ्या अर्थाने गौरवांकित झाली, असेच यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.
दरम्यान, शिक्षक लहू बोराटे यांच्या निरोप समारंभाचा भावनिक व्हिडीओ जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. तसेच शिक्षक बोराटे यांच्या फेसबुक खात्यावर असलेल्या त्या व्हिडीओला 31 हजार पेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. राज्यात हा व्हिडीओ वेगाने शेअर होत आहे. शिक्षकाचा गावकऱ्यांनी केलेल्या आश्रूमय, पुष्पमय सन्मानाची राज्यात चर्चा होऊ लागली आहे.