खाकी वर्दीतल्या ‘बाप’ माणसाने जपली अनोखी सामाजिक बांधिलकी, दिव्यांगांसोबत साजरा केला लाडक्या लेकीचा वाढदिवस, ऊर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। खरा तो एकची धर्म… जगाला प्रेम अर्पावे.. जगी जे हीन अति पतित…जगी जे दीन पददलित…तया जाऊन उठवावे..जगाला प्रेम अर्पावे.. सदा जे आर्त अति विकल.. जयांना गांजती सकल.. तया जाऊन हसवावे… जगाला प्रेम अर्पावे… असा ऊर्जादायी सकारात्मक संदेश देणारी मानवतावादी कृती करणारे आजही समाजात आहेत. त्यांचीच ही प्रेरणादायी गोष्ट !
खरं तर पोलिस हा शब्द उच्चारला की अनेकांच्या कपाळावर आट्या पडतात, पण खाकी वर्दीच्या आड सुध्दा एक माणूस दडलेला असतो, त्या माणसालाही संवेदनशील मन असते, तो हळवा, मानवतावादी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा माणुस असतो, याचाच प्रत्यय बुधवारी जामखेडमध्ये आला. एकिकडे मंगलमय वातावरणात गणरायाचे आगमन अन् दुसरीकडे लाडक्या लेकीसाठी खाकी वर्दीतल्या बाप माणसाने जपलेली सामाजिक बांधिलकी असा दुग्धशर्करा योग जुळून आला होता.
सदा जे आर्त अति विकल…जयांना गांजती सकलतया जाऊन हसवावे… जगाला प्रेम अर्पावे
त्याचं झालं असं की, जामखेड पोलिस स्टेशनच्या गुन्हा शोध पथकातील पोलिस काँस्टेबल अरूण पवार व प्रिती पवार यांच्या अवंती या कन्येचा बुधवारी पाचवा वाढदिवस होता. पवार यांना आपल्या लाडक्या लेकीचा वाढदिवस घरातच मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता आला असता, परंतू वाढदिवसावर होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत पवार दाम्पंत्याने आपल्या लाडक्या लेकीचा वाढदिवस जामखेड शहरातील दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर केक कापून साजरा केला. तसेच अवंतीच्या वाढदिवसानिमित्त मिल्लतनगर ऊर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी दोन्ही शाळेतील मुलांना अवंतीच्या वाढदिवसानिमित्त मिठाई व स्नेहभोजन देण्यात आले.
यावेळी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलिस काँस्टेबल अरूण पवार यांचे वडील तुकाराम पवार, मौलाना खलील, जामखेड तालूका मीडिया क्लबचे सचिव सत्तार शेख, पोलिस नाईक अविनाश ढेरे, संग्राम जाधव, आबासाहेब आवारे, विजय कोळी, संदिप राऊत, संदिप आजबे, भगवान पालवे, अरूण पवार, प्रिती पवार, मुफ्ती अब्दुल हाकीम, मुफ्ती अफजल कासमी, हाफिज नाजीम, हाफिज जुबेर, कोकरे सर सह आदी मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवस म्हटलं की, धांगडधिंगा हा आलाच, त्यातच वाढदिवसाचे औचित्य साधून पैश्यांची होणारी उधळपट्टी अमाप असते. सध्या चिमुकल्यांच्या वाढदिवसापासुन थोरांचे वाढदिवस दणक्यात साजरे करण्याची स्पर्धा अधिक वाढली आहे. यातूनच तथाकथित खोट्या प्रतिष्ठेचा फुगा फुगवला जात आहे. पण अश्याही परिस्थितीला छेद देण्याचे काम समाजात अनेक जण करताना दिसत आहेत. त्यातीलच एक म्हणजे पोलिस काँस्टेबल अरूण पवार हे होय. दरवर्षी पवार कुटुंबीय सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
छोट्याश्या मदतीमुळे गरजूंच्या चेहर्यावर निर्माण होणारा आनंद लाखमोलाचा – गायकवाड
पगार किती आहे, मिळकत किती आहे, यापेक्षा माझ्या बाळाचा वाढदिवस करत असताना इतर बाळांचा विचार करणारे फार कमी लोकं असतात, त्यातलं पवार कुटुंब आहे. लेकीच्या वाढदिवसावर अवाजवी खर्च न करता गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. अश्या पध्दतीचे उपक्रम वाढायला हवेत. आपल्या छोट्याश्या मदतीमुळे गरजूंच्या चेहर्यावर निर्माण होणारा आनंद लाखमोलाचा असतो. वंचित उपेक्षितांच्या अंधकारमय आयुष्यात उजेड आणण्यासाठी मानवतेच्या कार्यात सर्वांनीच खारीचा वाटा उचलायला हवा असे आवाहन जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी केले.
जे काय रंजले गांजले.. त्यासि म्हणे जो आपले.. तोची साधू ओळखावा..
जे काय रंजले गांजले.. त्यासि म्हणे जो आपले.. तोची साधू ओळखावा.. देव तेथे ची जाणावा.. तुकाराम महाराजांच्या अभंगातील मानवतावादी विचारांची चिमुकल्या अवंतीच्या आयुष्यात कृतिशीलपणे पवार दाम्पंत्य पेरणी करत आहे. त्यांची ही कृती कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अवंतीच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य देण्याचा पवार कुटुंबीयांनी घेतलेला निर्णय समाजापुढे नवा आदर्श प्रस्थापित करणारा आहे. – मौलाना खलील, मिल्लतनगर ऊर्दू शाळा, जामखेड