जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातून मोटरसायकल चोरून त्याची अहमदनगर जिल्ह्यात कमी किमतीत विक्री करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत चौघा मोटरसायकल चोरांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या टोळीकडून तब्बल 23 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Police have arrested four persons for stealing two-wheeler from Pune and selling in Ahmednagar, 23 lakh bikes seized nighoj parner)
ही कारवाई आळेफाटा पोलीस स्टेशनच्या पथकाने केली. याप्रकरणी प्रमोद लक्ष्मण सुरकुंडे (26), ज्ञानेश्वर रंगनाथ बिबवे (22), गणेश फक्कड कारखिले (23), आदिल कुरेशी (21) या चोघांना अटक करण्यात आली आहे.हे सर्व आरोपी पारनेर तालुक्यातील रहिवासी आहेत. ही धडाकेबाज कारवाई DYSP मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलिसांनी केली.
याबाबत सविस्तर असे की, आळेफाटा पोलिस स्टेशन हद्दीतील गुंजाळवाडी शिवारात एका अनोळखी इसमाने 29 मे रोजी शांताबाई बबन पावडे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून धुम ठोकली होती, या त्यानुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी तपास पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी बेल्हे, गुंजाळवाडी, राजुरी भागातील सीसीटीव्ही व तांत्रिक माहितीचा आधार घेतला.
अनोळखी इसम प्रमोद लक्ष्मण सुरकुंडे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याने मणीमंगळसूत्र चोरल्याची कबुलीही दिली. पोलिसांनी चोरी केलेला सोन्याचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला.
पुण्यात विविध ठिकाणी बाईक चोरीचे गुन्हे दाखल
दरम्यान आरोपीवर 2021 मध्ये अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाणे येथे वाहन चोरीचा एक गुन्हा दाखल असल्याने त्या अनुषंगाने त्याच्याकडे सखोल चौकशी केली. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने ज्ञानेश्वर रंगनाथ बिबवे, गणेश फक्कड कारखिले, आदिल मुख्तार अहमद कुरेशी यांच्या मदतीने मोटारसायकलींची चोरी केल्याचे कबूल केले. हे चौघे मोटरसायकल चोरून अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात चोरीच्या मोटरसायकली कमी किमतीत विकायचे.
या टोळीने पुणे ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या आळेफाटा येथील 1, नारायणगाव 1, ओतूर 1, शिरूर 4, शिक्रापूर 1, रांजणगाव एमआयडीसी 3, पुणे शहर अंतर्गत येणाऱ्या चंदननगर 3, बंडगार्डन 1, फारसखाणा 2, येरवडा 1, लोणीकंद 3, पिंपरी चिंचवड अंतर्गत चिखली 1, चाकण 3, अहमदनगर अंतर्गत पारनेर 2, कोतवाली 2, शिर्डी 1, नाशिक ग्रामीण अंतर्गत दिंडोरी 1, हिंगोली ग्रामीण अंतर्गत हिंगोली ग्रामीण 1, नवी मुंबई अंतर्गत रबाळे 1, औरंगाबाद ग्रामीण अंतर्गत एमआयडीसी 1 दुचाकी चोरल्याचे सांगितले. संबंधित पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
आतापर्यंत 45 मोटारसायकल जप्त
आरोपींकडून आतापर्यंत एकूण 45 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकलींपैकी 35 गुन्हे उघडकीस आले असून उर्वरीत मोटार सायकल मालकांची ओळख पटवणे सुरू आहे. आरोपी सध्या आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरु आहे.
जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे आणि आळेफाटा पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलिसांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, महिला पोलीस निरीक्षक रागिणी कराळे, पोलीस हवालदार चंद्रा डुंबरे, विनोद गायकवाड, भीमा लोंढे, प्रकाश जढर, लहानू बांगर, अमित माळूंजे, पंकज पारखे, संजय शिंगाडे, पोपट कोकाटे, हनुमंत ढोबळे, मोहन आनंदगावकर यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करीत आहेत.