धक्कादायक : 87 रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी आवळल्या डाॅक्टरच्या मुसक्या !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: कोरोना काळात उपचारात हलगर्जीपणा दाखवत रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील मिरज येथील ॲपेक्स केअर हॉस्पीटलच्या डाॅक्टर विरोधात गांधी चौक पोलिस स्टेशनला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळताच पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या डाॅक्टरला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व कासेगाव पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत जेरबंद केले आहे. डॉ. महेश जाधव असे अटक केलेल्या डाॅक्टरचे नाव आहे. कोविड साथीदरम्यान प्रथमच डाॅक्टरांवर गंभीर गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (Shocking: Doctor mahesh jadhav arrested by police for causing death of 87 patients)

कोरोना काळात अ‍ॅपेक्स केअर रुग्णालयात पुरेशी यंत्रसामग्री नसताना आणि रुग्णांवर उपचार करण्यास बंदी असतानाही उपचार करून भरमसाट बिले आकारल्याप्रकरणी रुग्णालयाचा संचालक डॉ. महेश जाधव याच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना काळात अ‍ॅपेक्स रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 205 रुग्णांपैकी 87 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी उपचारात हलगर्जीपणा करत अनेक रुग्णांच्या मृतास कारणीभूत असल्याचा ठपका ठेवून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

रुग्णालयात व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसतानाही डॉ. जाधव याने अ‍ॅपेक्स कोविड रुग्णालय सुरू केले होते. रुग्णांवर औषध उपचार करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय पथक न ठेवता होमिओपॅथीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रुग्णांवर उपचार केले होते. रुग्णांच्या नातेवाइकांकडून भरमसाट बिलांची आकारणी करून त्यांना बिलांच्या पावत्या देण्यास टाळाटाळ केली होती. याबाबत महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्याने या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचारास प्रतिबंध केले होते. बंदी असतानाही नवीन रुग्ण दाखल करून घेऊन उपचार सुरू ठेवल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे.

डाॅ जाधव याने अटक टाळण्यासाठी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता परंतू सांगली जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जाधव हा शुक्रवारी पळून जाण्याच्या तयारीत होता. स्थानिक अन्वेषण विभाग व कासेगाव पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत जाधव याला पाठलाग करत जेरबंद करण्यात आले. जाधव याला पुढील चौकशीसाठी गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली.