राजकीय भूकंप : राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलारांचा हैद्राबादमध्ये बीआरएस पक्षात प्रवेश, राष्ट्रवादीत उडाली खळबळ
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. विधानसभा 2024 ची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी हाती घेतली आहे. राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. अश्यातच राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अहमदनगर जिल्हा 14 जून 2023 रोजी एका मोठ्या राजकीय भूकंपाने हादरला आहे.या भूकंपाचा केंद्रबिंदू राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष ठरला आहे. (Political Earthquake in NCP, Regional Vice President Ghansham Shelar Joins BRS Party in Hyderabad, Shelar Joins Party in Presence of Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस (BRS) या राजकीय पक्षात हैद्राबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. शेलार यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Ghanshyam Shelar Join BRS)
घनःशाम शेलार यांचा राजकीय प्रवास भाजपातून – राष्ट्रवादी – शिवसेना – परत राष्ट्रवादी असा राहिलेला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते श्रीगोंदा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार होते, या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. घनःशाम शेलार हे श्रीगोंदा मतदारसंघातील रहिवासी आहेत. आक्रमक राजकीय नेतृत्व अशी त्याची ओळख आहे. ते गेल्या काही दिवसांपासून पक्षात दुर फेकले गेले होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.14 जून 2023 रोजी राष्ट्रवादीचे नेते घनःशाम शेलार यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला.
राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या घनःशाम शेलार यांनी भारत राष्ट्र समिती (BRS) या पक्षात जाहिर प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सोहळा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हैद्राबाद येथे पार पडला. मोजक्या कार्यकर्त्यांसह घनःशाम शेलार यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रशांत शेलार, शरद पवार, शामभाऊ जरे, अजिम जकाते, प्रविण शेलार, प्रकाश निंभोरे, संजय आनंदकर, केशव झेंडे, विकास भैलूमे, आबासाहेब शिंदे, संदिप दहातोंडे, रिंकू इथापे सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या कर्जत येथील घरावर काळे फासण्याची घटना ताजी असतांनाच घनश्याम शेलार यांनी पक्षाला रामराम केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला अहमदनगर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, आज सकाळपासूनच अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार अशी चर्चा होती. राष्ट्रवादीचे नेते घनःशाम शेलार यांच्या BRS पक्ष प्रवेशाने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. शेलार यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मोठे नेते बीआरएस (भारत राष्ट्र समिती) पक्षाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे अगामी काळात अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंपाची त्सुनामी येणार असल्याचे बोलले जाते. या सर्व घडामोडींचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादीला बसणार असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
बीआरएस पक्षात जाण्यासाठी राष्ट्रवादीचे अनेक नेते उत्सुक
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या माध्यमांतून तेलंगणा विकास माॅडेल देशभर घेऊन जाण्यासाठी मोहिम उघडली आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी महाराष्ट्रात पक्ष विस्तार हाती घेतला आहे.मराठवाड्यातील नांदेड सह आदी भागात त्यांनी सभा घेतल्या आहेत.अनेकांना त्यांनी पक्षात घेतले आहे.बीआरएस पक्षात जाण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत.विशेषता: राष्ट्रवादीतील अनेक जण बीआरएसच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते. त्यानुसार काल राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी बीआरएस पक्षात प्रवेश करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
बीआरएसचे गुलाबी वादळ अहमदनगर जिल्ह्यात दाखल
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी स्थापन केलेल्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. या पक्षाच्या झेंड्याचा रंग गुलाबी आहे. बीआरएसचे गुलाबी वादळ अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाले आहे. अहमदनगर च्या श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते घनःशाम शेलार यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.शेलार यांच्या खांद्यावर पक्ष कोणती जबाबदारी देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीचे शेलार उमेदवार
अगामी 2024 निवडणुकीत शेलार हे बीआरएसचे श्रीगोंदा मतदारसंघाचे उमेदवार असतील असेही बोलले जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात बीआरएस पक्ष दाखल झाल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली आहे. महाविकास आघाडीतील नाराज नेते बीआरएस पक्षात जाऊ शकतात अशी चर्चा आहे. तसे घडल्यास अगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे गणिते पुर्णता: बदलू शकतात, असे बोलले जात आहे.