जामखेड टाईम्स वृत्तसेवा : यंदा मान्सून लवकर दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता, प्रत्यक्षात जामखेड तालुक्यात मान्सून पूर्व पावसाने हुलकावणी दिली आहे. जुन महिना उजाडत आला तरी जामखेड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. यामुळे बळीराजाच्या चिंता वाढल्या आहेत. (Pre-monsoon rains in Jamkhed taluka turn their backs, anxious Baliraja’s attention to the sky)
कायम दुष्काळग्रस्त अशी जामखेड तालुक्याची ओळख आहे. पर्जन्यछायेचा प्रदेश असल्याने पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. दरवर्षी तालुक्यात नेहमी कमी पाऊस पडतो. यंदा देशभर भरपुर पाऊस होणार असे भाकीत हवामान खात्याकडून वर्तविण्यात आले, परंतू मान्सूनची वाटचाल खोळंबली आहे. यामुळे बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
जामखेड तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांकडून पेरणीपूर्व मशागतीचे कामे पूर्ण झाली आहेत. तर काही भागातील कामे वेगाने सुरु आहेत. मान्सूनपूर्व पाऊस न झाल्याने सध्या कडक ऊन आणि सोसाट्याचा वारा असे वातावरण कायम आहे.
वार्याची बदललेली दिशा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ठरली आहे.यंदा पाऊस लांबल्याने तालुक्यातील शेतकरी नक्की काय करावं?, या चिंतेत सापडला आहे. परिणामी, तालुक्यातील बी-बियाणे व खतांच्या दुकानांमध्ये यंदा शुकशुकाट आहे.
यंदा दमदार पावसाचा अंदाज वेधशाळेसह सर्वच यंत्रणांनी वर्तविल्यामुळे बळीराजासह बी-बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके विक्रेते दुकानदार खुशीत होते. त्यातून जामखेड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील असंख्य दुकानदारांनी आपापली दुकाने भरून ठेवली आहे. परंतू पाऊस न झाल्याने दुकानदारही चिंतेत आहेत.
जामखेड सध्या सोसाट्याचा वारा वाहू लागला आहे. अधूनमधून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू झाला असून, आसमंतात पांढऱ्या ढगांच्या दाटीमध्ये पावसाच्या काळ्या ढगांचा मात्र लवलेश दिसत नाही. वाढते तापमान आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सध्या तरी पाऊस पडण्याची शाश्वती दिसत नाही.रोजच्या नवीन हवामान अंदाजामुळे बळीराजा मात्र चागंलाच गोंधळला आहे.
यावर्षी पाऊस अनुकूल व वेळेवर येत असल्याचा अंदाज हवामानशास्त्र कडून मिळाल्यानंतर सर्वांना दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र मान्सूनचे अजुनही केरळात आगमन झालेले नाही.अनेक ठिकाणी खरीप हंगामासाठी जमिनीची मशागत पूर्ण झाली असून, शेतकरी पावसाच्या वाटेवर डोळे लावून बसले आहेत.