जामखेड : अखेर तो आला… जामखेड तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, या भागात पुढील तीन तास महत्वाचे – हवामान विभागाकडून अलर्ट जारी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । उकाड्याने हैराण झालेल्या जामखेडकरांना वादळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. दुपारपासून जामखेड तालुक्यातील वेगवेगळ्या भागात वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाने (pre-monsoon rain) हजेरी लावल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. गेल्या दीड तासांपासून तालुक्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे.दरम्यान हवामान विभागाने जारी केलेल्या अलर्ट नुसार पुढील तीन तास महत्वाचे असणार आहेत.
उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या जामखेडकरांना मान्सूनपूर्व पावसाने आज दिलासा दिला. जामखेड तालुक्यातील सर्वच भागात मान्सूनपूर्व पावसाने आज दुपारी हजेरी लावली. सकाळ पासून वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी दाटून आली होती. दुपारी दीड नंतर वादळी वारा अन विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यात हजेरी लावली.दुपारी तीन पर्यंत वादळी पावसामुळे कुठे काही नुकसान झाल्याची बातमी समोर आलेली नाही. जामखेड शहरातही या पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या जामखेड शहरवासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने जारी केलेल्या अलर्ट नुसार पुढील तासात राज्याच्या अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ढगांची दाटी असल्याने अनेक भागात विजा कोसळण्याचा धोका आहे, केंद्र सरकारच्या दामिनी ॲपवर यासंबंधी अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजा कोसळण्याचा धोका असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.