जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील काही भागात ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाने हजेरी लावली. काही भागात रिमझिम तर काही भागात जोरदार सरी बरसल्या. सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास पावसाने तालुक्यातील काही भागात हजेरी लावली.
ऑक्टोबर हिटने आधीच हैराण झालेले नागरिक विजेच्या लपंडावाने पुरते हैराण होऊन गेले होते. गेल्या काही दिवसांपासून सकाळी गारवा व दिवसभर कडक ऊन यामुळेच वातावरणात मोठा उकाडा निर्माण झालेला होता.
त्यातच कालपासून जामखेड तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. सकाळपासून ऊन ढगाचा खेळ सुरू होता. दुपारनंतर आकाशात ढगांची मोठी दाटी झाली होती. त्यानंतर सायंकाळी चार नंतर पावसाचे वातावरण तयार झाले होते. तालुक्यातील काही भागात रिमझिम, काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तालुक्यातील दैवदैठण भागात अर्धा तास मुसळधार पाऊस झाल्याने गावालगत असलेल्या ओढ्याला पुर आला होता. दैवदैठणच्या ओढ्याला अचानक पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे वृत्त आहे. या पावसाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तालुक्यातील हळगावमध्येही आज सायंकाळी काही काळ पावसाच्या सरी बरसल्या.
खरिप पिके आधीच पावसामुळे वाया गेले आहेत. आता तुरीचे पिक ऐन बहरात असतानाच अवकाळी पाऊस झाल्याने तुरीच्या पिकाचा नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. इतरही पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याचा मोठा धोका आहे. यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे.
दरम्यान दक्षिण पुर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतातील काही भागात पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस ढगाळ हवामान व पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अरबी समुद्र व लक्षद्वीप भागात सक्रीय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गोवा, घाट परिसर, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. जामखेड तालुक्यातही ढगाळ हवामान राहणार आहे.