जामखेड : राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात ‘सत्यवान मंडलिक’ लिखित ‘म्हातोबाचा माळ’ कथासंग्रहाचे प्रकाशन !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । ॲक्टिव्ह टीचर्स सामाजिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात सत्यवान मंडलिक लिखित ‘म्हातोबाचा माळ’या ग्रामीण कथा संग्रहाचे मोठ्या थाटामाटात प्रकाशन पार पडले. हा शानदार सोहळा पुणे येथे पार पडला. लेखक सत्यवान मंडलिक हे मुळचे जामखेड तालुक्यातील हळगाव येथील रहिवासी आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते कराड तालुक्यात वास्तव्यास आहेत.
लेखक सत्यवान मंडलिक हे अतिशय संघर्षांतून पुढे आले आहेत. त्यांचा जन्म कष्टकरी कुटूंबातला. बालपणापासून त्यांनी गावखेड्यातील माणसांचा अनुभवलेला जगण्याचा संघर्ष त्यांच्या लिखाणातून नेहमी प्रकट होत असतो, त्यांच्या लिखाणातून समाजातील दाहक वास्तवतेचे दर्शन घडते. ग्रामीण बोलीभाषेतील त्यांच्या लिखाणाच्या शैलीमुळे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे याची आठवण आल्याशिवाय राहत नाही, म्हणूनच सत्यवान मंडलिक यांच्या म्हातोबाचा माळ या कथासंग्रहाच्या प्रकाशनाची सर्व जबाबदारी मी स्वीकारली, असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक विक्रम अडसूळ सर यांनी यावेळी केले.
यावेळी लेखकांनी आपल्या खास शैलीतल्या कथाकथनाने साऱ्यांची मने जिंकली तर यावेळी पार पडलेल्या कवी संमेलनात सत्यवान मंडलिक यांनी ‘शेतकरी माझा जगाचा पोशिंदा’ ही शेतकऱ्याची व्यथा मांडणारी कविता सादर करून दाद मिळविली. यावेळी पार पडलेल्या कवी संमेलनात राज्यभरातून आलेल्या कवींनी बहारदार कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली.