Pune building accident | पुणे इमारत दुर्घटना, पाच ठार, जखमींवर उपचार सुरू, सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर, ठेकेदार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Pune building accident | पुण्याच्या येरवडा येथील शास्त्रीनगर भागातील एका नव्या इमारतीचा स्लॅब कोसळून 5 मजुर ठार झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली होती. या घटनेतील मृतांना राज्य सरकारच्या वतीने 5 लाख रूपयांच्या मदतीची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. या दुर्घटनेप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची सरकारकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.
येरवड्यातील ब्लू ग्रास बिझनेस पार्क येथील बांधकाम साइटवर स्लॅब साठी तयार करण्यात आलेली जाळी गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मजुरांच्या अंगावर कोसळली होती. या दुर्घटनेत पाच मजूर जागीच ठार झाले तर इतर पाच जण जखमी झाले आहेत.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी बांधकाम साइटवर सुरक्षेच्या योग्य उपाययोजना न करता मजुरांचा मृत्यूस गंभीर जखमी करण्यासाठी कारणीभूत म्हणून ब्लू ग्रास बिझनेस पार्क कंपनीसह अहलुवालिया कन्स्ट्रक्शन यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा सह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
दरम्यान गुरुवारी रात्री वाडीया बंगला कल्याणीनगर आवारात घडलेल्या या दुर्घटनेच्या घटनास्थळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. याप्रकरणी दुर्घटनेतील जखमी मजूर मोहम्मद नाहीर (वय 21, रा. मुळगाव कटियार, बिहार, सध्या राहणार ब्लू ग्रास बिझनेस पार्क लेबर पार्क) याने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दुर्घटनेतील सर्व मृत व जखमी हे एकाच गावातील असून गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बांधकाम साइटवर लोखंडी जाळी बसविण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी दहा ते पंधरा मजूर काम करत होते. अचानक काम सुरू असताना लोखंडी जाळी खाली काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर कोसळली. यात दहा जण अडकले होते.
या दुर्घटनेनंतर सुमारे दोन तास सुरू असलेल्या मदत कार्यानंतर दुर्घटनेत अडकलेल्या मृत व गंभीर जखमी मजुरांना बाहेर काढण्यात आले. यामधील तीन जखमींवर ससून रुग्णालयात तर दोन जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घटनास्थळी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी रात्री भेट दिली. हे सर्व मजूर बिहार येथील कटियार या गावातील असून मागील काही दिवसांपासून वाडीया बंगला येथील बांधकाम साइटवर मजुरीचे काम करत होते.
दरम्यान पुण्यात घडलेल्या या दुर्घटना प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली आहे. या घटनेबद्दल अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेत मृत झालेल्या मजुरांच्या कुटूंबियांना पाच लाखाची मदतीची घोषणा पवार यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनेतील कारणे शोधून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सख्त सुचना पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.