Anil Ramod : विशेष सीबीआय न्यायालयाने अनिल रामोडचा जामीन अर्ज फेटाळला, कोर्टात सुनावणीवेळी काय युक्तीवाद झाला ? वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 8 लाख रूपयांच्या लाच प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या IAS डाॅ अनिल रामोड (Anil Ramod) यांच्या जामीन अर्जावर सीबीआय कोर्टाने 16 जून रोजी मोठा निर्णय सुनावला आले. अनिल रामोड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अनिल रामोड यांनी वकिलामार्फत दाखल केलेला जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. (Pune Crime News)
सोलापुर जिल्ह्यातील महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला वाढवून देण्यासाठी पुणे महसुल विभागातील अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांना 8 लाखाची लाच स्विकारता सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणात सीबीआयने अनिल रामोड यांना 9 जून रोजी अटक केली होती. 10 जून रोजी न्यायालयाने 3 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने रामोड यांच्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. अनिल रामोड यांना येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल रामोड यांनी ॲड सुधीर शहा यांच्या मार्फत 14 जून रोजी सीबीआय न्यायालयात जामीन अर्ज केला होता. आज या अर्जावर सुनावणी झाली. सीबीआयचे वकिल अभयराज अरीकर यांनी अनिल रामोड यांच्या जामीन अर्जास विरोध केला. रामोड यांनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. अनिल रामोड हे उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यांना जामीन दिल्यास पुरावे गोळा करण्यास अडचणी निर्माण होतील, तसेच पुरावे नष्ट करण्यासह साक्षीदारांवर दबाव आणतील, असा युक्तिवाद सीबीआय वकिलांनी केला.
तसेच अनिल रामोड यांच्या घर झडतीतून 6 कोटी 64 लाख तर कार्यालयातून 1 कोटी 28 लाख असे एकुण 7 कोटी 92 लाख रूपये हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे अनेक स्थावर मालमत्ता आहेत. त्याची अंदाजे किंमत 5 कोटी 30 लाख इतकी आहे. त्यांच्या कार्यालयातील कागदपत्रे अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.जामीन दिल्यास कागदपत्रे नष्ट करण्यासह त्यात छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी सीबीआयचे वकिल अभयराज अरीकर यांनी कोर्टाकडे केली. विशेष न्यायाधीश ए. एस वाघमारे यांनी सीबीआय वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत अनिल रामोड यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
दरम्यान, सीबीआय विशेष न्यायालयाने अतिरिक्त विभागीय आयुक्त डाॅ.अनिल रामोड यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे रामोड यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. त्यामुळे रामोड यांचा येरवडा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.