जामखेड : अहिल्यादेवींच्या चरणी आपली निष्ठा आणि श्रध्दा ठेवा;जीवनात कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही – आमदार प्रा.राम शिंदे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : “मी आण्णासाहेबांच्या संपर्कात आल्यानंतर अगदी छोटा कार्यकर्ता होतो.आजवरच्या राजकीय प्रवासात उतलो नाही, मातलो नाही, घेतलेला वसा टाकला नाही, ध्येयाशी कधीच तडजोड केली नाही. कोणती शक्ती विरोधात आहे. माझ्या विरोधात कोण आहे, याचा मी कधीच विचार करत नाही. कारण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी माझी श्रध्दा आणि निष्ठा आहे. त्यांचा विचार घेऊन माझा निरंतर प्रवास सुरु आहे. यापुढे लढायचं निश्चित आहे आणि लक्ष्य भेदायचं हे सुध्दा निश्चित आहे, असा निर्धार आमदार प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केला.”
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र चोंडी येथे रविवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 228 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार प्रा राम शिंदे बोलत होते. यावेळी माजी मंत्री तथा चोंडी विकास प्रकल्पाचे शिल्पकार आण्णासाहेब डांगे,आमदार रामहरी रूपनर, ॲड चिमणराव डांगे, सह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
“यावेळी पुढे बोलताना आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी यासाठी शासनस्तरावर आपण काम करतोय. सगळ्यांनी ऐकमेकांना सहकार्य करत भविष्याची वाटचाल सुरु ठेवावी. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारांवर आपण आपली वाटचाल ठेवल्यास आपल्या जीवनामध्ये येणारे दु:ख निश्चितच दुर होतील, असेही आमदार प्रा राम शिंदे यांनी स्पष्ट केले.”
कोणाच्या कपाळाला कपाळ घासून यश मिळत नाही ….
“यावेळी पुढे बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, आण्णासाहेबांच्या करंगळीला धरून मी देखील त्यांच्या मार्गक्रमणावर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा विचार घेऊन पुढे चाललो आहे. अहिल्यादेवींच्या चरणी आपली निष्ठा आणि श्रध्दा ठेवून जर आपण काम केलं तर जीवनात कधीच कुठली गोष्ट कमी पडत नाही. पण त्याच्यात जर का आपण गडबड केली तर मग कोणाच्या कपाळाला कपाळ घासून यश मिळत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.”
अहिल्यादेवींचा विचार अंगीकारणारे जीवनात कधीच अपयशी ठरत नाहीत
“आपण आपल्या इतिहासाची उजळणी केली पाहिजे. इतिहास लक्षात ठेवला पाहिजे. वर्तमान काळात त्याचं अनुकरण केलं पाहिजे. भविष्य काळात आपण त्याच्यामध्ये शोधला पाहिजे. त्यासाठीच आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी चोंडीसारख्या छोट्या गावांत जन्म घेऊन माळवा प्रांताचा राज्यकारभार पाहिला. त्यांनी केलेला राज्यकारभार, संघर्ष आजही दिशादर्शक प्रेरणादायी आहे.अहिल्यादेवींचा विचार अंगीकारणारा जीवनात कधीच अपयशी ठरत नाही, असे प्रतिपादन आमदार प्रा राम शिंदे यांनी केले.”
आण्णासाहेबांमध्ये दैवी शक्ती…
“आण्णासाहेब डांगे यांचं वय सध्या 88 इतकं आहे. जवळपास 45 वर्षांपासून त्यांना शुगर आहे. त्यांना काही वर्षांपासून गुडघादुखीचा त्रास सुरु झाला होता. हा त्रास सुरू झाल्यावर किती त्रास होतो हे सर्वांनाच माहिती आहे. गुडघेदुखीचा त्रास सुरु असतानाच त्यांची गुडघ्याची वाटी सरकली होती. एकदा आण्णासाहेबांना भेटलो, त्यांना विचारलं काय केलं त्या वाटीचं, ते म्हणाले काही नाही दोन्ही हातांनी धरली आणि जागेवर बसवली. गुडघ्यात चमक निघाली तर माणसं चार चार दिवस झोपून राहतात आणि आण्णासाहेबांनी तर स्वता: ची वाटी स्वता: बसवली, ही दैवी शक्तीचयं, याच्याशिवाय दुसरं असुच शकत नाही, असे म्हणत आमदार प्रा.राम शिंदे यांनी माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या वक्तव्याचे जोरदार स्वागत केले.”