मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी अहिल्यामातेने सरकारला सद्बुद्धी द्यावी – मनोज जरांगे पाटील
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : गेल्या 60 वर्षांपासून आमच्यावर अन्याय होतोय, आम्ही सगळे निकष पार केलेत. तरीही आम्हाला आरक्षण मिळत नाही, परंतू आता मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्पावर आली आहे. मराठा आरक्षणाचं अंदोलन आता सामान्य लोकांनी हातात घेतलं आहे. त्यामुळे आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, त्यामुळे आता सरकारने सामान्य जनतेचा अंत पाहू नये, असा खणखणीत इशारा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी श्री क्षेत्र चोंडी येथे बोलताना दिला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 17 दिवसांचे प्राणांतिक उपोषणाचे अंदोलन केल्यानंतर संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांच्या दौर्यावर आहेत. 6 ऑक्टोबर रोजी ते जामखेड दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र चोंडी येथे भेट दिली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे वंशज आमदार प्रा.राम शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक होत अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ज्यांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला अश्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक व्हायला अन् लढण्याची ऊर्जा घ्यायला इथे आलो. अहिल्यादेवींचे दर्शन घेऊन लढण्यास नवी ऊर्जा मिळाली. मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी अहिल्यामातेने सरकारला सद्बुद्धी द्यावी, हे साकडे अहिल्यामातेला घातलं आहे, अहिल्या माता नक्कीच या सरकारला सद्बुद्धी देईल, असा विश्वास यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, बाजार समितीचे सभापती शरद (दादा) कार्ले, प्रा सचिन गायवळ, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, माजी उपसभापती रविंद्र सुरवसे,तुषार पवार, बाजार समितीचे संचालक गौतम उतेकर, डॉ गणेश जगताप, वैजीनाथ पाटील, लहू शिंदे, पांडुरंग उबाळे, बापुराव ढवळे, नगरसेवक अमित चिंतामणी, सोमनाथ राळेभात, ॲड प्रविण सानप, गणेश लटके, उदय पवार, उध्दव हुलगुंडे, सह आदी उपस्थित होते.
दरम्यान, मराठा अंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी येथे शुक्रवारी भेट दिली. त्यांच्या स्वागतासाठी यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.